

सुनील कदम
कोल्हापूर : दुधातील भेसळ सर्वसामान्यांना भयचकित करणारी आहे. पाणी, स्टार्च, युरिया, डिटर्जंट आणि चक्क कपडे धुण्याचा सोडाही दुधात भेसळ करण्यासाठी वापरला जातो. हे सगळं पोटात गेल्यावर नागरिकांच्या आरोग्याचं खोबरं होणार हे ठरलेलच!
दुधातील भेसळीची साखळी!
साधारणत: एक लिटर दुधात ४० ग्रॅम स्निग्धांश (फॅट) आणि ८५ ग्रॅम अन्य घनपदार्थ (एसएनएफ) असतात, त्यामध्ये प्रोटिन, लॅक्टोज, मिनरल्स आणि सॉल्ट या घटकांचा समावेश असतो. दूध उत्पादकांकडून हे दूध व्यापारी, गवळी किंवा अन्य व्यावसायिक घटकांच्या हातात पडले की त्यात पहिली भेसळ होते ती पाण्याची! एक लिटर दुधात एक ते पाव लिटर पाणी मिसळले जाते. साहजिकच दुधातील स्निग्धांश आणि अन्य घटकांचे प्रमाण कमी होते आणि दूध पातळ वाटायला लागते. ते घट्ट दिसण्यासाठी म्हणून मग त्यात स्टार्च मिसळला जातो. दुधाला फेस दिसावा म्हणून त्यात चक्क डिटर्जंट पावडर मिसळली जाते. शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करून ते घरोघरी रतीब घालणाऱ्या गवळ्यांकडून हा ‘गोरखधंदा’ केला जातो.
व्यावसायिक भेसळ!
पाण्याची भेसळ केलेले हे दूध जर दूध संस्थेला पुरविले जाणार असेल तर भेसळ उघड होण्याचा धोका असतो. कारण, दूध संस्थेत प्रामुख्याने दुधातील स्निग्धांश आणि अन्य घनपदार्थांचे प्रमाण मोजून त्या पटीत दर दिला जातो. शिवाय ठरावीक प्रमाणापेक्षा कमी स्निग्धांश असलेले दूध स्वीकारले जात नाही. त्यामुळे स्निग्धांश आणि एसएनएफ जादा दिसण्यासाठी दुधात साखर आणि युरियासारखे घातक पदार्थ मिसळले जातात. आता जो युरिया शेतात रासायनिक खत म्हणून वापरला जातो, तो दुधातून माणसाच्या पोटात गेल्यावर काय होत असेल, याचा अंदाज येण्यास हरकत नाही.
भेसळीचा पुढचा टप्पा!
अनेकवळा दूध उत्पादकांकडून आज स्वीकारलेले दूध बहुतांश संस्थांकडून सगळी प्रक्रिया पूर्ण करून साधारणत: दुसऱ्या दिवशी शहरांकडे पाठविले जाते. या दरम्यानच्या कालावधीत दूध खराब होऊ नये म्हणून त्यात चक्क कपडे धुण्याचा सोडा घातला जातो, या प्रक्रियेमुळे म्हणे दूध खराब होत नाही; पण याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होईल, याचा विचारच केला जात नाही.
बनावट दुधाचा सागर!
उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या काही मंडळींनी तर गेल्या काही वर्षांपासून राज्यात चक्क बनावट दुधाचा धंदा मांडला आहे. अंघोळीला वापरला जाणारा शॅम्पू, गोडेतेल, साखर आणि पाणी यांच्या मिश्रणातून असे बनावट दूध तयार केले जाते. ज्या भागात पिण्याच्या पाण्याची वानवा आहे, त्या भागातून बनावट दुधाचे टँकरच्या टँकर शहरांकडे धावताना दिसतायत. त्यामुळे या सगळ्या प्रकारांची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.