

राजेंद्र जोशी
कोल्हापूर : प्लास्टिक कचरा जाळण्यामुळे हवेतील विषारी घटकांचे प्रमाण मर्यादेपलीकडे वाढत असतानाच प्लास्टिकच्या बेसुमार वापरामुळे मायक्रोप्लास्टिकचे कण मानवी मेंदू, प्रजनन अवयव आणि ऊतींमध्ये सापडत आहेत. यामुळे या कणांचा शरीरात प्रवेश होतो; शिवाय हृदयरोग आणि मेंदुविकारांशीही कणांचा संबंध असल्याचे प्राथमिक पुरावे उपलब्ध झाले आहेत, असे निरीक्षण ‘द लॅन्सेट’ या नियतकालिकाशी संबंधित संशोधकांच्या संशोधनातून पुढे आले आहे. यामुळे प्लास्टिकच्या घातक परिणामांबाबत अजूनही अधिक संशोधनाची गरज आहे. त्यामुळे प्लास्टिकविषयक जागतिक करारावर अंतिम चर्चा होण्यापूर्वी ‘पूर्वतयारी द़ृष्टिकोन’ अवलंबिण्याची गरज असल्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले.
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणार्या दु:ष्परिणामांचा अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि संशोधकांनी ‘द लॅन्सेट काऊंटडाऊन ऑन हेल्थ अँड प्लास्टिक’ या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. यानिमित्ताने ‘द लॅन्सेट’ या नियतकालिकामध्ये आरोग्य धोरण प्रसिद्ध केले असून, संशोधनाच्या आधारे प्लास्टिक, मायक्रोप्लास्टिक आणि रसायनांचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम यांचा ऊहापोह करण्यात येणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तो संयुक्त राष्ट्राच्या ‘जागतिक प्लास्टिक करार’ करण्यासाठी आधारभूत माहिती म्हणून महत्त्वाचा ठरणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या वतीने ‘ग्लोबल प्लास्टिक ट्रीटी’च्या चर्चेसाठी गेल्या काही काळापासून चर्चासत्र सुरू आहे. यातील पाचव्या सत्रातील दुसरा टप्पा मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडची राजधानी जीनिव्हा येथे सुरू झाला असून, 14 ऑगस्टपर्यंत ही चर्चा सुरू राहणार आहे. या चर्चेचा पहिला टप्पा गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दक्षिण कोरियातील बुसान येथे झाला होता. या कराराद्वारे प्लास्टिकच्या उत्पादनापासून वापर आणि विल्हेवाटीपर्यंत संपूर्ण जीवनचक्र नियंत्रित करणारा कायदेशीर दस्तऐवज तयार करण्यात येतो आहे.
प्लास्टिक ही वस्तू अविघटनशील म्हणून ओळखली जाते. तिचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होतो. प्लास्टिकच्या उत्पादनावेळी हवेत सूक्ष्म कण (पीएम 2.5) मिसळतात. यामुळे प्रदूषणात तर भर पडतेच. शिवाय, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईडसारखी घातक रसायनेही उत्सर्जित होतात. त्याचा थेट परिणाम संबंधित उत्पादनाच्या ठिकाणी काम करणार्या कर्मचार्यांवर होतो, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्याविषयी जगातील विविध देशांत जनजागृतीची मोहीम सुरू आहे. भारतातही ही मोहीम सुरू असली, तरी तिची अंमलबजावणी मात्र कागदावर आहे. या संशोधनात सहभागी झालेल्या तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिकच्या उत्पादनांचा वेग सध्या आहे त्याप्रमाणे सुरू राहिला, तर 2060 पर्यंत त्या वापरात तिपटीने वाढ होऊ शकते. प्लास्टिकच्या उत्पादन, वापर आणि विल्हेवाटीच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने ‘जागतिक प्लास्टिक करार’ मसुदा जाहीर होण्यापूर्वी या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे, असे या संशोधकांचे मत आहे.
‘द लॅन्सेट’च्या अहवालानुसार, लास्टिक कचरा खुल्या जागेत जाळला जातो. विशेषत:, कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये सरासरी 60 टक्के प्लास्टिक कचरा उघड्यावर जाळला जातो. प्लास्टिक कचर्यामुळे डासांना अंडी घालण्याच्या प्रक्रियेसाठी पोषक वातावरण होते. तसेच, त्यावर सूक्ष्म जीव वाढून संसर्गजन्य रोग आणि प्रतिजैविक प्रतिकारकशक्ती वाढीला लागतो. साहजिकच, यामुळे औषधोपचार निष्फळ ठरतात आणि रुग्णालयातील खर्चाचा बोजाही वाढतो, असेही या अहवालामध्ये नमूद केले.