

कोल्हापूर : सीसीटीव्ही कॅमेरा, मेटल डिटेक्टर, स्कॅनर अशा उपकरणांनी सामाजिक सुरक्षिततेला मोठा आधार दिला. स्वाभाविकतः त्याचा प्रचार आणि प्रसार गावोगावी पोहोचणे अपेक्षित होते. तसा तो पोहोचलाही. या यंत्रणांच्या उपलब्धतेसाठी मोठा निधी खर्ची पडला. त्यामध्ये मलई खाणार्यांनी ती यथेच्छ ओरपण्याचे कामही केले. त्यानुसार यंत्रणा प्रस्थापित झाल्या. परंतु त्यांच्या देखभाल दुरुस्तीविषयी सर्वत्र अनास्था असल्याने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या यंत्रणांची उपयुक्तता काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाने या उपकरणांवरच सामाजिक सुरक्षिततेचा भार सोडल्यामुळे बंद उपकरणांनी सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
कोल्हापूर शहरात या बंद यंत्रणांचा अनुभव नित्याचा आहे. अंबाबाई मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. येथे सुरक्षिततेसाठी चारही दरवाजांवर मेटल डिटेक्टर उभे आहेत. बॅगेमधून अवैध वस्तू मंदिरात जाऊ नयेत, याकरिता मोठे स्कॅनरही बसविले आहेत. या यंत्रणांभोवती पोलिसांचा बंदोबस्तही आहे. परंतु, जर अवैध वस्तूंच्या प्रवेशाला अटकाव करणारा स्कॅनर बंद असेल, तर या उभारलेल्या यंत्रणांचा उपयोग काय? या बंद स्कॅनरच्या माध्यमातून एखादी वस्तू आत जाऊन जर मंदिरात मोठा प्रसंग घडला, तर त्याची जबाबदारी कोणावर टाकायची? हे सारे गंभीर मुद्दे आहेत. पण सध्या तरी मंदिर सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे.
राजर्षी शाहू रेल्वे स्थानकावर तर विकासकामांच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकल्याची तक्रार आहे. रेल्वे स्थानकावर अनेक फुकटे आणि भटके यांचा मोठा वावर असतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर सीसीटीव्ही कॅमेर्याचा अभाव असल्यामुळे येथे ओपन बारचे स्वरूप आले आहे. मद्यपी अरुंद बोळातून प्लॅटफॉर्मवर येऊन बाटली घेऊन बसतात. काही वेळा तिथेच शरीर अस्ताव्यस्तपणे सोडून देतात. याचे रेल्वे प्रशासनाला किती गांभीर्य आहे, ते त्यांनाच ठाऊक.
शहरात अपघात झाला वा काही वादग्रस्त स्थिती उद्भवली, तर त्याचे सक्षम पुरावे हाती असावेत, यासाठी रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु, यातील किती कॅमेरे चालू आहेत, याची माहिती घेतली, तर धक्कादायक वास्तवाला सामोरे जावे लागते. गेल्या आठवड्यात स्टेशन रोडवर हॉटेल राजपुरुषच्या दारात ज्येष्ठ नागरिकाला परप्रांतीय युवकाच्या गाडीने धडक दिली. ज्येष्ठ नागरिकाच्या मेंदूत मोठा रक्तस्राव झाला आणि वाहनचालकाने वाहन सोडून पळ काढला. अखेरीस दोन दिवसांत हा रुग्ण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपास सुरू झाला. पण सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्यामुळे फुटेज मिळत नाही, अशी तपास करणार्यांची अडचण होती.
गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सीसीटीव्ही बंद असल्यामुळे तपासात मोठ्या अडचणी आल्या आहेत. परंतु, ही यंत्रणा सक्षमतेने कार्यान्वित राहील, यासाठी प्रयत्न होत नाहीत. मग नागरिकांच्या करातून लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या यंत्रणेतून सामाजिक सुरक्षिततेचे भवितव्य काय, याचे उत्तर प्रशासनाला द्यावयाचे आहे.