

कोल्हापूर : पहिल्यांदाच विमान प्रवास, खिडकीतून पाहिले असता ढग, हातात बोर्डिंग पास, अंगावर नवा ब्लेझर आणि डोळ्यांत मोठी स्वप्ने... कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मंगळवारचा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या 25 विद्यार्थ्यांनी थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अभ्यास सहलीसाठी विमानातून भरारी घेतली.
हा उपक्रम कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीअंतर्गत राबवण्यात येत असून, गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील अग््रागण्य वैज्ञानिक संस्थेचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा हा प्रेरणादायी प्रयत्न आहे. प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येत असून, यावर्षी या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या सहलीसाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र व भरीव तरतूद करण्यात आली असून, सातत्याने असा उपक्रम राबवणारी कोल्हापूर ही राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे.
मंगळवारी दुपारी महानगरपालिका मुख्य इमारत चौकातून के.एम.टी. बसद्वारे विद्यार्थ्यांना विमानतळाकडे रवाना करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. या अभ्यास सहलीत 13 मुले व 12 मुली असे 25 विद्यार्थी, त्यांच्यासोबत 2 मार्गदर्शक शिक्षक, 1 शिक्षिका अधिकारी व 1 महिला डॉक्टर असा एकूण 29 जणांचा ताफा सहभागी आहे. विद्यार्थ्यांचा विमान प्रवास, ‘इस्रो’ येथे निवास व्यवस्था तसेच परतीच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर व उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी केले आहे.
सहलीनिमित्त विद्यार्थ्यांना एकसारखे ब्लेझर व बूट मोफत देण्यात आले आहेत. प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांनी माहिती दिली. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार, प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, लिपिक संजय शिंदे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव व शांताराम सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.