कोल्हापूर : कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे यात दुमत नाही. मीही कृती समितीची सदस्या आहे. त्यामुळे या प्रश्नाचा मला अभ्यास व गांभीर्य असल्याने पालकमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही नूतन महापौर रूपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीला दिली.
महापौरपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीसोबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ही बैठक झाली. महापौर निकम म्हणाल्या, शहराचा विकास होण्यासाठी हद्दवाढ अत्यंत गरजेची आहे. शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव, अपुरे रस्ते अशा विविध कारणांनी हद्दवाढीचा प्रश्न गेली अनेक वर्षे रेंगाळत आहे. शहाराच्या विकासाच्या अजेंड्यावर सध्या काम सुरू असून बोलणे कमी आणि काम जास्त या भूमिकेतून मी सध्या कार्यरत आहे. एकीकडे हद्दवाढीसाठी पाठपुरावा करताना दुसरीकडे शहराचे सौंदर्य वाढविणे आणि स्वच्छता राखणे यावर आपण सर्व मिळून भर देऊया, जेणेकरून ग्रामीण भागात शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसून ते आपोआप हद्दवाढीत येण्यास तयार होतील. बालिंगा ग्रामस्थांची हद्दवाढीला सहमती आहे. याप्रमाणे इतर गावांनाही आपण हद्दवाडीचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करू.
हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. कृती समितीने तीन कार्यकर्ते द्यावेत जेणेकरून ते रोज महापौर दालनात या कामासाठी पाठपुरावा करून मला काय करावे लागते, कोणाशी संपर्क करायचा आहे, याबाबत मार्गदर्शन करतील. कृती समिती हा प्रश्न मांडताना त्यांची तळमळ मी स्वत: अनुभवली आहे. त्यामुळे आता हद्दवाढीशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत. राजर्षी शाहू महाराज यांच्या भूमीत पाणीपट्टी थकबाकीसाठी महापालिकेस नोटीस येते ही बाब निंदनीय आहे. हद्दवाढ झाल्यानंतर शहर विकासास चालना मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
हद्दवाढ झाली, तर महापालिका चांगल्या वर्गात रूपांतरित होईल, विकासासाठी निधी मिळेल. सध्या शहराची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे ग्रामीण जनता नाराज आहे. कोल्हापूर शहरच सुस्थितीत नाही, तर आम्ही तुमच्याकडे येऊन काय करणार, असे त्यांना वाटते. कोल्हापूर शहर सुस्थितीत करू. त्यामुळे ग्रामीण जनता स्वत:हून हद्दवाढीचे समर्थन करेल. मी स्वत: ग्रामीण जनतेशी चर्चा करीत आहे. बालिंगा येथील ग्रामस्थांनी कोल्हापूर शहरात समाविष्ट होण्याचा शब्द दिला आहे, असेही महापौर निकम यांनी सांगितले.