‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघ आपल्याकडेच हवा

इच्छुकांनी केली उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
Meeting of office bearers of Kolhapur district on Matoshree in Mumbai
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : उमेदवार कोणीही असू दे, त्याला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू पण कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मुंबईत मातोश्रीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक बोलवण्यात आली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजन इच्छुक आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. यापूर्वी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातून सहा आमदार निवडून आले होते. यानंतर झालेल्या निवडणुकीत प्रकाश आबिटकर वगळता अन्य उमेदवार पराभूत झाले. पक्षातील बंडखोरीनंतर उबाठाकडून स्वतंत्रपणे कोणत्या मतदारसंघात आपली ताकद आहे, याची चाचपणी करण्यात आली. यावेळी राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले या मतदारसंघाबरोबरच कोल्हापूर उत्तर मिळालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाकडून जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे व शहर प्रमुख रविकिरण इंगवले इच्छुक आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उमेदवार कोण द्यायचा, हे नंतर बघू, पण जो उमेदवार देणार त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार का, अशी विचारणा केली. तेव्हा कोल्हापूर उत्तर मधील इच्छुकांनी कोणतेही मतभेद मनात न ठेवता जो उमेदवार द्याल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. पण, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काही करून आपल्या पक्षाकडेच घ्या, असा आग्रह ही शिवसैनिकांनी केला. यावेळी ठाकरे यांना संजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. या बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, आ. मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले व पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे. त्यातच महाविकास आघाडी म्हणून अजून पाठबळ मिळणार आहे. ठाकरे गटाकडे हा मतदारसंघ आल्यास आपला उमेदवार निवडून येणार असल्याची खात्रीच इच्छुकांनी उद्धव ठाकरे यांना दिली आहे.

पदाधिकार्‍याच्या श्रीमुखात लगावली

या बैठकीला सकाळी जिल्ह्यातील पदाधिकारी मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याबरोबर असणार्‍या सहकार्‍यांना न्यायालयीन प्रक्रियेत लढा देण्यात अग्रभागी असणार्‍या पदाधिकार्‍याने तुम्ही इकडे कुठे, असा सवाल केला. तेव्हा संतप्त शिवसैनिकाने तू कोण विचारणार, असे म्हणत संबंधिताच्या श्रीमुखात लगावली, अशी चर्चा आहे. अगोदरच कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील इच्छुकांचा वाद मातोश्रीवर पोहोचला होताच. अशातच मातोश्रीच्या दारातच मारामारी झाल्यानंतर वरिष्ठांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news