

कोल्हापूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकांच्या वेतनश्रेणीबाबत २०२२ मध्ये शासकीय निर्णय झाला आहे. पण त्यामधील तांत्रिक अटींमुळे गेल्या चार वर्षांपासून त्याचा प्रत्यक्ष लाभ वैद्यकीय शिक्षकांना मिळालेला नाही. महाराष्ट्रातील सहायक प्राध्यापकांना ग्रेड २, पे लेव्हल १० आणि ५७,७०० रुपये मूलभूत वेतन मिळत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वेतनश्रेणी खूपच कमी आहे. सहायक प्राध्यापकांना ‘पे लेव्हल’ वाढवा, अशी मागणी होत आहे.
विविध राज्यांच्या भरती नियम व वेतनश्रेणींच्या तुलनात्मक तक्त्यानुसार गुजरात, मध्य पदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड राज्यांच्या तुलनेत ग्रेड १, पे लेव्हल ११ लागू आहे. तेथील सहायक प्राध्यापकांचे मूलभूत वेतन ६८९०० ते ७१००० रुपये आहे. ओडिशात पे लेव्हल १२, हिमाचल प्रदेशात पे लेव्हल १३ तर एम्स आणि पीजीआयसारख्या केंद्रीय संस्थांमध्येही पे लेव्हल १२ लागू आहे. त्यामुळे समान पात्रता असतानाही महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षकांना तुलनेत कमी वेतन आहे. महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या मोठी आहे. मात्र, त्याचवेळी सहायक प्राध्यापकांच्या प्रारंभिक वेतनश्रेणीत महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत मागे असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.