

पेठवडगाव : पेठवडगाव येथील एका वैद्यकीय व्यावसायिकाची औषध खरेदी-विक्री आणि आर्थिक व्यवहारांतून तब्बल १ कोटी ८६ लाख २ हजार ६६४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संग्राम सुरेश पाटील (रा. कापूरवाडी, ता. हातकणंगले) आणि शुभम रामराव पाडळे (रा. सावर्डे, ता. हातकणंगले) या दोघांविरोधात पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. राकेश अशोक पाटील (वय ३५, रा. पेठवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, आशिर्वाद मेडिकल आणि आशिर्वाद डिस्ट्रीब्युटर या व्यवसायांमधील औषध खरेदी-विक्री, बँक व्यवहार, जीएसटी भरणा, कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच वार्षिक लेखापरीक्षणाची जबाबदारी संशयितांकडे विश्वासाने सोपविण्यात आली होती. नोव्हेंबर २०२२ पासून हे व्यवहार सुरू होते.
दरम्यान, औषध विक्रीच्या नोंदी, संगणकीय प्रणालीतील औषधसाठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध असलेला औषधसाठा यांची तपासणी केली असता मोठी तफावत आढळून आली. औषध विक्रीतून मिळालेली रक्कम बँक खात्यात जमा न करणे, तसेच संगणकीय नोंदींमध्ये प्रत्यक्षापेक्षा अधिक औषधसाठा दाखविणे, असे प्रकार झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
सन २०२२ ते २०२६ या कालावधीतील औषध खरेदी-विक्री आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता, संशयितांनी परस्पर औषधांची विक्री करून त्याच्या नोंदी संगणकीय प्रणालीतून हटविल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच वितरकांकडून औषधे खरेदी केल्याचे दाखवून प्रत्यक्षात कमी औषधे प्राप्त होणे आणि विक्रीतून मिळालेली रक्कम संबंधित बँक खात्यांमध्ये जमा न करणे, असे प्रकारही घडल्याचा आरोप आहे.
या विविध व्यवहारांच्या माध्यमातून फिर्यादीचा विश्वास संपादन करून संशयित दोघांनी मिळून १ कोटी ८६ लाख २ हजार ६६४ रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पेठवडगाव पोलिसांनी संग्राम पाटील आणि शुभम पाडळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
या कथित फसवणुकीतून मिळालेली १ कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम संशयितांनी नेमकी कुठे वळवली? ती कोणत्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून फसवणुकीमागील संपूर्ण साखळी पोलीस उघड करणार का? असे अनेक प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाले आहेत.