

कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 ते 26 या वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) प्रतिबंध लसीकरण मोहिमेला गती द्या, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पहिली ते बारावीपर्यंतच्या मुला-मुलींसाठी डोळे तपासणीची मोहीम राबवा, असेही त्यांनी शुक्रवारी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मुश्रीफ म्हणाले, इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या म्हणजेच 10 ते 26 वयोगटातील शाळांतील व शाळाबाह्य मुलींना त्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेऊन गर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधासाठीचे लसीकरण करून घ्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुढे ढकललेली ही मोहीम पुन्हा सुरू करा. शिक्षण विभागाने पालक बैठकांचे नियोजन करावे. आरोग्य विभागाने पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर स्तनाच्या कर्करोगासाठीची तपासणी शोध मोहीम सुरू करा.
द़ृष्टिदोषाचे निदान प्राथमिक अवस्थेतच होण्यासाठी वेळेत डोळे तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची डोळे तपासणी मोहीम हाती घ्या. डॉक्टरांची बैठक घेऊन त्याचे नियोजन करा. द़ृष्टिदोष आढळणार्या मुलांना सीएसआर निधीमधून मोफत चष्मे दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
लसीकरण व विद्यार्थ्यांच्या डोळे तपासणी मोहिमेसाठी आरोग्य, शिक्षण व संबंधित विभागांनी नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा माता, बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई, तसेच आरोग्य व शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.