

शिरोळ : महापुरापासून पश्चिम महाराष्ट्र वाचवण्याची सध्या गरज आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या विरोधात जनआंदोलन उभे करा, असे आवाहन नर्मदा बचाव समितीच्या अध्यक्षा व ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केले.
शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी सायंकाळी त्यांना ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पाटकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी के.एल.ई.चे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे होते. यावेळी सह्याद्री अग्रो कंपनीचे विलासराव शिंदे यांना ‘समाजकार्य’ पुरस्कार व ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे यांना देण्यात आलेला युवा प्रेरणा पुरस्कार त्यांचे वडील सुरेश कुसाळे यांनी स्वीकारला. सर्व पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर व अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रारंभी दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांनी स्वागत केले. विनोद शिरसाट यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. अशोकराव माने, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, सावकर मादनाईक, धनाजीराव जगदाळे, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, एम. व्ही. पाटील, महादेव धनवडे, पृथ्वीराज यादव, वैभव उगळे, अशोक कोळेकर, मुसा डांगे, दिलीप पाटील-कोथळीकर, सर्जेराव पवार, आप्पासाहेब लठ्ठे, यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. अनिलराव यादव यांनी आभार मानले.
स्व. आप्पासाहेब पाटील यांचे सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. आज त्यांच्या नावाने आपल्याला जो पुरस्कार देण्यात आला त्यामुळे आमच्या कर्तव्याची जाणीव हा पुरस्कार नेहमीच करत राहणार असल्याचेही पाटकर म्हणाल्या.