

कोल्हापूर : दिवाळीची धामधूम चालू असतानाच एमडी ड्रग्जची तस्करी करणार्या तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. ऋषीकेश प्रफुल्ल जाधव (वय 28, रा. गीता अपार्टमेंटशेजारी, घाटगे कॉलनी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून 4.03 ग्रॅम एमडी ड्रग्ज, दुचाकी असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चौकशीत मुंबई कनेक्शन उघड झाल्याने तस्करीत गुंतलेले आंतरराज्य रॅकेट चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संशयित ऋषीकेश जाधव याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. शहर परिसरात व्हिडीओग्राफर म्हणून ओळखल्या जाणार्या तरुणाकडे झडतीत एमडी ड्रग्ज आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांच्या आदेशाने शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संतोष डोके व पथकाने रुईकर कॉलनी चौक - कदमवाडी रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई केली. संशयित जाधव हा काही दिवसांपासून तस्करीतील उलाढालीशी संबंधित असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बच्चू यांना मिळाली होती. अप्पर पोलिस अधीक्षकांच्या आदेशाचे विशेष पथक काही दिवसांपासून संशयिताच्या मागावर होते.