

कोल्हापूर : कोल्हापूरसह इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास संघटित टोळ्यांच्या म्होरक्यांसह गुन्हेगारांची अजिबात गय केली जाणार नाही. प्रसंगी त्यांच्यावर ‘मोका’अंतर्गत कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी सोमवारी दिला. हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणार्यांना स्थानबद्ध करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. दोन्हीही शहरांतील निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रभारी अधिकार्यांसह पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. समाजात गुंडागर्दी करून दहशत माजविणार्या सराईत गुन्हेगारांसह समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तत्काळ वरिष्ठांमार्फत प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरीसह करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे 98 पेक्षा जादा सराईत गुन्हेगारांना नोटिसा बजावण्यात आल्या. संबंधितांना शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत बजावण्यात आले होते. त्यानुसार उपस्थित राहिलेल्या गुंडांची अपर पोलिस अधीक्षक डॉ. बच्चू यांनी सोमवारी दुपारी झाडाझडती घेतली.
निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे गैरकृत्ये करणार नाही, सामाजिक तणाव निर्माण होणार नाही, यासंदर्भात संबंधित गुन्हेगारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याच्या सूचनाही अपर पोलिस अधीक्षकांनी प्रभारी पोलिस अधिकार्यांना दिल्या. खून, खुनाचा प्रयत्न, गँगवॉर, राजकीय वैमनस्यातून गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना स्थानिक पोलिस ठाण्यात रोजची हजेरी बंधनकारक करण्यात येणार असल्याचेही डॉ. बच्चू यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर, इचलकरंजी शहरांतील काही सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक काळात संबंधितांवर लवकरच कारवाई केली जाईल. हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधित गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सुनावले. यावेळी शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक संतोष डोके, श्रीराम कण्हेरकर, सतीश होडगर, किरण लोंढे आदी उपस्थित होते.