

आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी राज्यातील पहिला ‘मोका’ अंतर्गत प्रस्ताव करवीर पोलिसांनी दाखल केला आहे. बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील, श्रीमंत पाटील, विजय कोळसकर यांच्यासह सहाजणांवर मोका कारवाईचा प्रस्ताव तयार करून विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अशा प्रकरणात राज्यातील हा पहिला ‘मोका’ प्रस्ताव दाखल झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणार्या टोळ्यांचा धुमाकूळ सुरू आहे. पाच वर्षांत गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी १३ गुन्हे दाखल असून, १०७ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये बोगस डॉक्टर, एजंट, गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारे विक्रेते, गर्भपात करणारे डॉक्टर यांचा समावेश आहे. गेल्याच महिन्यात अवैध गर्भपात करणार्या डॉक्टर गायकवाडसह त्याचा मदतनीस, एजंट यांना अटक केल्यावर तीन वर्षांत त्यांनी ४०७ गर्भपात केल्याचे समोर आले. यात बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील (रा. बालिंगा, ६ गुन्हे), श्रीमंत पाटील (४ गुन्हे), विजय कोळसकर (३ गुन्हे), महेश पाटील (२ गुन्हे), प्रशांत जाधव (२ गुन्हे), दत्तात्रय पाटील (३ गुन्हे) यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी हा प्रस्ताव पोलिस अधिक्षकांकडे पाठविला आहे. या सहाजणांसह त्यांच्या नातेवाईकांच्याही नावावर असणाऱ्या मालमत्तेची चौकशी होणार आहे.