

कोल्हापूर ः मराठी भाषा आणि संस्कृतीचा आपल्याबरोबर घेऊन गेलेला समृद्ध वारसा 1800 सालापासून मॉरिशसमध्ये उसाच्या मळ्यात मजूर म्हणून गेलेला मराठी समाज पिढ्यान्पिढ्या जतन करीत आहे. त्यांच्या नवीन पिढ्यादेखील यात मागे नाहीत. गणेशोत्सव, महाशिवरात्री, दिवाळी आदी सण मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा त्यांनी राखली आहे. मूळच्या मॉरिशसमधील असलेल्या निशी लक्ष्मण कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मॉरिशसमधील मराठी भाषा, संस्कृतीचा इतिहास यावर संशोधन करीत आहेत. यातून दोन्ही देशांमधील सामाजिक, सांस्कृतिक नात्यांचा नव्याने उलगडा होणार आहे.
निशी लक्ष्मण सध्या मॉरिशसमधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठाने त्यांना 150 वर्षांनंतर मॉरिशसमधील मराठी भाषा व संस्कृतीची स्थिती काय आहे, हा अभ्यासासाठी संशोधन विषय दिला आहे. मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पीएच.डी. करीत आहेत. 1834 नंतर रत्नागिरी, मालवण, ठाणे, सातारा व कोल्हापूर भागातील 40 हजार मराठी लोक करारबद्ध मजूर म्हणून मॉरिशसमध्ये स्थलांतरित झाले. इंडो मॉरिशियन हा येथील प्रमुख वांशिक गट असून, त्यामुळे येथे मिश्र संस्कृती पाहावयास मिळते. मॉरिशसची क्रिऑल ही मातृभाषा आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये भारतीय भाषा वापरल्या जातात. मॉरिशसच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, उर्दू, तमिळ, तेलगू, मराठी, चिनी व अरबी भाषा शिकवल्या जात असल्याचे निशी यांनी सांगितले.
मॉरिशसमधील मराठी लोकांनी लोकसाहित्य जतन करून ठेवले आहे. कथा, कविता, नाटक, कादंबरी, लघुकथा आणि निबंध असे मराठी साहित्याचे प्रकार मॉरिशसमध्ये आढळतात. मराठा मंदिर, मराठी साहित्य परिषद व मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनसारख्या संस्था मराठी भाषा आणि परंपरांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. मॉरिशसमधील मराठी साहित्य समृद्ध असून, प्रा. ग. पू. जोशी, डॉ. बिदन आबा, सदाशिव गोविंद जगताप व सोना धर्मिया, गुरुजी श्रीराम मालू यासारख्या लेखकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नाटक, कथा, कविता व कादंबर्यांच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब मॉरिशसच्या साहित्य क्षेत्रात उमटले आहे. अलीकडे येथे चांगले दर्जेदार साहित्य निर्माण होत असल्याचे निशी लक्ष्मण म्हणाल्या.
मॉरिशसमध्ये शाळेत मराठी शिकवली जाते; मात्र दैनंदिन व्यवहारात तिचा वापर कमी होत आहे. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र व महात्मा गांधी संस्था सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तसेच, मॉरिशसमधील मराठी समाज आपल्या परंपरांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने झटत असल्याचे निशी लक्ष्मण यांनी सांगितले.