कोल्हापूर: कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमाचे संस्थापक शिवाजीराव पांडुरंग पाटोळे (७२) यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. (Shivajirao Patole)
पाचगाव येथील आर. के. नगर येथे मातोश्री वृद्धाश्रम आहे. पाटोळे कुटुंबीयांनी कोणत्याही शासकीय मदतीशिवाय ताे उभा केला हाेता. 'मातोश्री'ने अनेक वृद्धांना आधार दिला. पाटोळे यांनी १९९५ला हा वृद्धाश्रम सुरू केला हाेता. पाटोळे कोल्हापुरातील गुजराती हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. २००७ ते निवृत्त झाले. .
पाटोळे यांनी आई रुक्मिणी पांडुरंग पाटोळे यांच्या दोन एकर जमिनीमध्ये हा वृद्धाश्रम उभा केला. त्यासाठी त्यांनी स्वतःचा पगार, आईचा फंड यातून हा वृद्धाश्रम बांधला. कोणत्याही शासकीय मदतीविना वृद्धाश्रम २७ वर्ष सुरू आहे. सध्या या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून ६० जेष्ठ नागरिक वास्तव्य आहेत. पाटोळे यांची तिसरी पिढी सध्या मातोश्री वृद्धाश्रमाचे काम पाहत आहे.
पाटोळे यांना २००७-०८ मध्ये महापालिकेच्यावतीने कोल्हापूर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पुणे येथील संस्थेचा गंगा-गोयल पुरस्कार त्यांना मिळाला आहे. शिव-बसव पुरस्कार, हुपरी रेंदाळ सहकारी बँक पुरस्कार, रवी बँक पुरस्कार आदी संस्थांनी त्यांना गौरवले आहे.