

दिलीप भिसे
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून मटका, तीन पानी जुगार, कॅसिनोसह अमली तस्करीतील उलाढाली हद्दपार करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्यांना दिले होते. मात्र वरिष्ठांच्या आदेशाला यंत्रणेकडूनच कोलदांडा देण्यात येत असल्याचे चित्र आहे. मोबाईलवर सुरू असलेला मटका पुन्हा चिठ्ठ्यांवर झळकू लागला आहे. मटका, तीन पानी जुगार आणि सीमाभागासह महामार्गावरील कॅसिनोतून दररोज 500 कोटींची उलाढाल होऊ लागली आहे. 75 बड्या मटका बुकींसह सुमारे 450हून अधिक एजंटांच्या साखळीतून सामान्यांची लुबाडणूक होत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारता काळे धंदेवाल्यांसह तस्करी टोळ्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची घोषणा केली होती. चारपेक्षा अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या काळे धंदेवाल्याविरुद्ध कठोर कारवाई, प्रसंगी मोका, तडीपारीसारख्या प्रभावी कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
कोल्हापुरातील उपनगरांसह इचलकरंजी, शहापूर, हातकणंगले, शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर, वडगाव, मुरगूड, गडहिग्लज, शिरोली एमआयडीसी, कागल, आजरा परिसरात मटका जोरदार सुरू आहे.
साटेलोटे असलेल्या कलेक्शनवाल्यांच्या पुढाकाराने काळे धंदेवाल्यांसह तस्करी टोळ्यांचे साम्राज्य पूर्ववत होत आहे. सीमा भागात कॅसिनोची उलाढाल वाढू लागली आहे.
महानगरातून मटका उलाढालीवर नियंत्रण ठेवणार्या नामचीन मटका किंगशी थेट संपर्क साधणार्या मुरगूडसह इचलकरंजी, शहापूर, शिरोळ, कुरुंदवाड येथील बुकी आणि तीनपानी जुगारी अड्डे चालविणार्यांची काळ्या धंद्यातील उलाढालीवर हुकूमत चालते. किंबहुना संबंधित मंडळींच्या नियंत्रणाखाली शहरासह जिल्ह्यात दररोज कोट्यवधीच्या उलाढाली होत आहेत. सामान्यांची होणारी अडवणूक, पिळवणूक रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी कठोर पावले उचलली खरी; पण झारीतील शुक्राचार्यांकडून वरिष्ठांच्या आदेशाला कोलदांडा देण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
इचलकरंजी : पोलिस आणि नागरिक यांच्यातील थेट संवाद वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करताचा फूट पेट्रोलिंग वाढवण्यावर भर देण्यात येईल. अमली पदार्थांचा विळखा दूर करण्यासाठी गांजा तस्करी करणार्यांचे रॅकेट मोडून काढू. पोलिस ठाण्यांतर्गत शिस्त लावताना कामात हयगय करणार्यांवर तसेच अवैध व्यवसायांना पाठीशी घालणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गडहिंग्लज विभागाचे नूतन अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी दिली.
अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमाडे पाटील यांची बदली झाल्याने गडहिंग्लज विभागाची सूत्रे नूतन अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी स्वीकारली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. अवैध व्यवसाय रोखणे, वाहतूक व्यवस्था यासह संघटित गुन्हेगारी व वाढत्या गुन्हेगारीचा बीमोड करू. इचलकरंजी शहर गडहिंग्लज विभागात सुरक्षिततेसाठी आणखी सक्षम उपाययोजना राबवताना कायद्याचे उल्लंघन करणार्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.