

कोल्हापूर : केवळ कोल्हापूरच नव्हे, तर तमाम पश्चिम महाराष्ट्रातील जनमनाच्या हृदयावर गेल्या आठ दशकांहून अधिक काळ सातत्याने अधिराज्य गाजवणार्या व जनेतचा एकमुखी आवाज असलेल्या दै. ‘पुढारी’ला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गुरुवारी (दि. 1) अक्षरश: जनसागर लोटला. ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये रंगलेल्या या स्नेहमेळाव्याने संपूर्ण भाऊसिंगजी रोडलाच उत्सवाचे स्वरूप आले. ‘पुढारी’च्या मुख्यालयावर केलेली आकर्षक विविधरंगी विद्युत रोषणाई, टाऊन हॉलच्या ऐतिहासिक वास्तूला साजेल अशी सजावट व भव्य आकर्षक व्यासपीठ यांनी समारंभाला वेगळीच उंची मिळाली. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा दिमाखात सुरू होता.
गेली 87 वर्षे अखंडपणे जनतेचा आवाज बनून राहिलेल्या ‘पुढारी’ने 88 व्या वर्षात पदार्पण केले. त्याचबरोबर आपल्या पत्रकारितेचा सुवर्ण महोत्सव साजरा केलेले दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकताच सहस्रचंद्रदर्शन सोहळा अलोट जनसागराच्या उपस्थितीत साजरा झाला. या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेल्या ‘पुढारी’च्या वर्धापन दिन सोहळ्याला आगळेच महत्त्व लाभले.
अखंडपणे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार्या व जनतेला न्याय मिळवून देणार्या ‘पुढारी’ला शुभेच्छा देताना विविध क्षेत्रांतील मान्यवर ‘पुढारी’ची चौफेर घोडदौड व ‘360 मीडिया अंडर वन रूफ’च्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख करत दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व ‘पुढारी’ माध्यम समूहाचे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मितादेवी जाधव, राजवीर जाधव, तेजराज जाधव यांचे अभिनंदन करत होते. दैनिक पुढारी, पुढारी न्यूज चॅनल, टोमॅटो एफ.एम. रेडिओ, पुढारी आऊटडोअर मीडिया, पुढारी वेब, पुढारी डिजिटल अशी ‘पुढारी’ची विविध माध्यमे जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देत असल्याबद्दल नागरिकांनी ‘पुढारी’ला धन्यवाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.