

मलकापूर : अश्लील व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार करून एका 35 वर्षीय कर्मचारी विवाहितेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी टेकोली (ता. शाहूवाडी) येथील माजी उपसरपंच, माजी सैनिक आणि सध्या मुंबई येथे पोलिस सेवेत असलेल्या संदीप प्रकाश पाटील (वय 43, सध्या रा. डोंबिवली पूर्व, मुंबई) याला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दाखल केली आहे.
याबाबतची माहिती अशी, पीडिता पतीपासून विभक्त असून, संशयित संदीप पाटील हा तीन वर्षांपासून तिच्या संपर्कात होता. संदीपने तिला माझ्या मर्जीप्रमाणे काम कर. मी सांगेन तसे वाग; अन्यथा तुझी नोकरी घालवेन, अशी धमकी दिली. यातून पीडितेशी त्यानेे जवळीक वाढवत तिचा हात धरला. याला तिनेे विरोध करताच तुझी बदनामी करेन, अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. तिचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ करून ठेवले. ते व्हायरल करण्याची धमकी देत कोल्हापूर बस स्टँड परिसर, बजागेवाडी येथे बोलावले.
तेथे चार तोळ्यांचे मंगळसूत्र, लहान मंगळसूत्र, तोळ्याच्या नेकलेससह तिच्याकडील सर्व दागिने जबरदस्तीने काढून घेत संशयिताने पुन्हा अत्याचार केला. तिच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी केली. तिने कर्ज काढून संशयितास सहा लाख 45 हजार रुपये दिले. राहत्या घरातही त्याने अत्याचार केला. तिचा मोबाईल फोडून अन्य काही लोकांना अश्लील फोटो व व्हिडीओ पाठवले. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत हे प्रकरण गेले. याबाबत तिने विचारणा केली असता, संशयिताने तिला शिवीगाळ केली. तसेच, तिच्याविरोधातच चेक बाऊन्सची केस दाखल केली.
पुन्हा पीडितेला आझादनगर, मुंबई येथे बोलावून तिच्याकडून परत देण्याच्या अटीवर खोटी नोटरी करून बारा लाख रुपये घेतले. पीडितेने पैसे परत करण्यासाठी तगादा लावत मोबाईलमधील फोटो व व्हिडीओ डिलिट कर, अशी मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने तिने शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली. यावरून पोलिसांनी संदीप पाटील यास अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय घेरडे करीत आहेत.