

कोल्हापूर : बुधवारी होणार्या अक्षयतृतियेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची बाजारपेठ सज्ज झाली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांसह सोने, इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तू, गॅझेट्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीसाठी ग्राहक आतूर झाले आहेत. अक्षयतृतिया हा हिंदू परंपरेनुसार साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्त्वपूर्ण सण मानला जातो. या सणाला वाहने, सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी जोर असतो, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे.
ग्राहकांसाठी आकर्षक सवलती आणि विविध एक्स्चेंज ऑफर्स देखील दिल्या जात आहेत, ज्यामुळे खरेदीला उधाण येणार आहे. मुहुर्तावर घरासाठी वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. सणानिमित्त एक्स्चेंज ऑफर्ससह कमी डाऊनपेमेंट सुविधा देखील ग्राहकांकडून अधिकाधिक प्रतिसाद मिळवत आहेत.
सोने आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी गुजरी आणि सराफ बाजारपेठत सोने खरेदीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चांदीच्या वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची अपेक्षा आहे.लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅबलेट, पॉवर बँक, होम थिएटर, एलईडी टीव्ही तसेच 5-जी मोबाईल आणि आयफोन सारख्या फीचर्स असलेल्या फोनला मागणी वाढण्याची शक्यता आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आणि धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या अक्षयतृतीयेचा सण बुधवार, दि. 30 रोजी कोल्हापुरात सर्वत्र साजरा होणार आहे. सोने, चांदीच्या दागिन्यांपासून गृहोपयोगी वस्तू, नवीन वास्तू खरेदी तसेच शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी अक्षयतृतीयेचा दिवस खास मानला जात असल्याने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे. घरोघरी तांब्याच्या कलशाचे पूजन, धान्यपूजन तसेच दानधर्म करून हा सण साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. सुबत्ता, समृद्धी यांचा क्षय होऊ नये, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. अक्षयतृतीयेच्यानिमित्ताने घरोघरी तसेच देवस्थाने, मंदिरे येथेही कलशपूजन करण्यात येणार आहे. तांबे किंवा पितळेच्या कलश, पंचपात्र यामध्ये धान्य, सुपारी, नाणे ठेवून त्याची विधिवत पूजा केली जाते. गरजूंना दानधर्म केला जातो. या हंगामात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने पूजेच्या साहित्यात आंब्याचे महत्त्व आहे.