

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे समजते. त्यामुळे सभापतिपदाची संधी भुदरगड, राधानगरीला मिळणार की हे पददेखील कागलमध्येच राहणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, सभापतिपदाच्या नावावर चर्चा करण्यासाठी रविवारी (दि. 6) आघाडीच्या संचालकांची बैठक दुपारी चार वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे यांनी एकत्र येत आघाडी केली आहे. पहिल्या वर्षी सभापतिपद काँग्रेसला व नंतर चार वर्षांमध्ये जनसुराज्य शक्ती व राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी दोन वर्षे असा फॉर्म्युला ठरला आहे. पहिल्या दोन वर्षांत काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला सभापतिपदाची संधी देण्यात आली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सभापतिपद येणार आहे. शिवसेना शिंदे गटानेही या पदावर दावा केला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिवसेनेचा सभापती करावा, अशी मागणी केली आहे; त्यामुळे सभापतिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीकडून शेखर देसाई, शिवाजीराव पाटील आणि सूर्यकांत पाटील इच्छुक आहेत. महिलांना संधी द्यावी, असाही सूर आहे. राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ आपल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी आग्रही असतात. यावेळी सहकारातील जिल्हा बँक आणि गोकुळ या दोन मोठ्या संस्थांचे अध्यक्षपद त्यांच्या घरात आहे. त्यामुळे बाजार समितीचे तिसरे पद आपल्या तालुक्यात ठेवणार की भुदरगड किंवा राधानगरीला संधी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सभापती निवडीसाठी सोमवारी दुपारी 3 वाजता संचालकांची बैठक बोलाविली आहे. शहर उपनिबंधक, सहकारी संस्था डॉ. प्रिया दळणार यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात बैठक होणार आहे.