

कुरुंदवाड : कुरुंदवाड येथे दुपारपासून फुलांची आवक वाढल्याने 140 रुपये किलोने विक्री होणारा झेंडू फुले सायंकाळी उशिरा दहा रुपये किलो दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली.यावर्षीही शेतकऱ्याचा फुलांमध्ये नफा न मिळाल्याने हिरमोड झाला आहे. शेवटी घरी जाताना काही शेतकऱ्यांनी फुले रस्त्यावर फेकून देत संताप व्यक्त केला. दरम्यान बाजारपेठेत कृत्रिम फुले मिळत असल्याने ग्राहकांनी त्याला पसंती दिली.तरीदेखील पूजेसाठी फुले घेण्याकडे ग्राहकांचे प्रमाण अल्प होते.अशातच सायंकाळी बाजार पेठेत फुलांची आवक वाढल्याने दराने निच्चांक गाठला
दिवाळी-दसरा या सणाच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजनसाठी झेंडूच्या फुलाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. त्या निमित्त शेतकरी आपल्या शेतीत मोठा उत्पादन खर्च लावून लागवड केलेली उत्पादीत झेंडूची फुले शहरातील बाजारात विक्रीसाठी आणतात. यंदा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विकण्यासाठी आणली. मात्र, आवक वाढल्याने फुलांचे दर गडगडून प्रति किलो 10 रुपये इतके घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाले.परिणामी झेंडूफुले उत्पादक शेतकरी हैराण झाल्याचे पाहावयास मिळाले.
शेतातील फुलांची तोडणी करत असताना बाजारपेठेतुन दराचा अंदाज घेत होते.100 रुपये दर होता. दुपारी 3 वाजता फुले बाजार पेठेत दाखल झाल्यानंतर मात्र दराला उतरती लागली. संजय नाईक या शेतकऱ्याने दिवसभरातील फुलांच्या उतरत्या दराचा स्टेटस लावून नाराजी व्यक्त केली.
फुले स्वस्त झाल्याने ग्राहक आंनदात होता.आम्हाला दर मिळाला नाही आम्ही दुःखी आहोतच मात्र ग्राहकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला समाधान वाटले की शेतकरी हा राजा असतो राजा कधी रडत नसतो असे सांगून रामगोंड पाटील.खिद्रापूर या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.