

कोल्हापूर; सेंट्रल डेस्क : दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील फूल बाजारांत झेंडूच्या फुलांना मागणी वाढू लागली आहे. मात्र, सणासुदीला मागणी वाढली तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळेलच असे नाही. पुणे बाजारात गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांत २.६० लाख किलो झेंडूची आवक झाली होती आणि सरासरी २० रुपये किलो दर मिळाला होता; मात्र फुलांची आवक कमी झाल्यास दसऱ्यापर्यंत १५० रुपये आणि दिवाळीला २५० रुपये प्रतिकिलो दर होऊ शकतो, असा अंदाज आहे. गतवर्षी दसऱ्याला ६० ते १०० रुपये किलो मिळालेला दर दिवाळीत २० ते ३० रुपयांपर्यंत घसरला होता. त्यामुळे यंदा वाढती मागणी, आवक आणि प्रत्यक्ष शेतकरी दर यांकडे लक्ष लागले आहे.
दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना मागणी वाढत असली, तरी सणाच्या काळातील मागणी, बाजारात येणारी आवक आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळणारा दर यांचा मेळ बसणे महत्त्वाचे आहे. यंदा २०२६ मध्ये गणेशोत्सवाच्या काळात मोठी आवक झाल्याने पुण्यात झेंडूला सरासरी २० रुपये किलो भाव मिळाला होता. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मात्र बाजारपेठेनुसार दरांत फरक दिसत आहे. पुणे घाऊक बाजारपेठेत १२ ऑक्टोबर रोजी सामान्य झेंडू १० ते २० रुपये किलो दर होता. म्हजे सरासरी १५ रुपये किलो. तुळजापुरी झेंडू सरासरी ४० रुपये आणि मुंबई, दादर फूलबाजारात १६ ऑक्टोबरपर्यंत झेंडू फुलांचा २० ते ६० रुपये प्रतिकिलो होता.
झेंडूची आवक आणि बाजारपेठ
पुणे फूल बाजारातील आवक २.६० लाख किलो (१४ ते १८ सप्टेंबर)
फूलबाजाराची एकूण उलाढाल ३.६८ कोटी (गणेशोत्सवातील ५ दिवस)
झेंडूचा सरासरी घाऊक दर २० रु. प्रति किलो (पुणे बाजारपेठ सप्टेंबर)