Marathi Startup Names | स्टार्टअप विश्वाला भुरळ मराठी नावांची

तरुण उद्योजकांकडून ग्राहकांशी नाळ जोडणार्‍या बदलाची नांदी
Marathi Startup Names | स्टार्टअप विश्वाला भुरळ मराठी नावांची
Published on
Updated on

अनुराधा कदम

कोल्हापूर : एकेकाळी स्टार्टअप म्हणजे इंग्रजी नाव आणि आंतरराष्ट्रीय ओळख अशी सांगड होती; मात्र आता चित्र बदलताना दिसत आहे. तरुण उद्योजकांनी आपल्या कॅफे, बुटिक, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि विविध सेवा क्षेत्रातील स्टार्टअप व्यवसायांना मराठी नावे देण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. भाषिक अभिमानासोबतच ग्राहकांशी नाळ जोडणार्‍या या बदलाची नांदी तरुण उद्योजकांकडून केली जात आहे.

ग्राहकांशी भावनिक नाते निर्माण करणे, सोशल मीडियावर वेगळेपण मिळवणे आणि ‘मेड इन महाराष्ट्र’ ही ओळख ठळक करणे, या उद्देशाने अनेक स्टार्टअप्सला मराठी नाव देण्यासाठी तरुणाईचा कल वाढत आहे. मराठी राजभाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर हा बदल अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.

कॅफे संस्कृतीत मराठीचा सुगंध

विविध शहरांत ‘कट्टा कॅफे’, ‘गप्पाष्टक’, ‘साखरझोप’, ‘चहा कट्टा’, ‘भुरका’, ‘तांबडा-पांढरा‘, ‘माजघर’, ‘चटकमटक’, ‘ओंजळ’ अशी नावे लोकप्रिय होत आहेत. सोशल मीडियावर अशा मराठी पाट्यांचे फोटो लक्ष वेधून घेतात आणि ब—ँडची ओळख झपाट्याने वाढते, असे तरुणाई म्हणते.

फॅशन, लाईफस्टाईललाही मराठीचा स्पर्श

‘रंगरेषा’, ‘ओवाळणी’, ‘गंध’, ‘माती’, ‘साज’, ‘रूपांजली’, ‘छबी’, ‘सावली’, ‘काठपदर’, ‘धागा’ यासारखी नावे फॅशन आणि बुटिक क्षेत्रात दिसू लागली आहेत. ग्राहकांना नावातच आपलेपणा आणि परंपरेचा स्पर्श जाणवतो, असे युवा उद्योजकांचे मत आहे.

डिजिटल जगतातही मराठीचा प्रभाव

डिजिटल आणि कंटेंट क्षेत्रातही ‘मंत्र’, ‘उमेद’, ‘स्पंदन’, ‘शब्दवेध’, ‘कवडसा’, ‘अमुकतमुक’, ‘वायफळ’, ‘कवितेचं पान’, ‘संवाद’, ‘तुझंमाझं’, ‘गावभर चर्चा’, ‘विषय खोल’, ‘ज्ञानबिडी’ अशा नावांचे पॉडकास्ट आणि मीडिया पेजेस तयार होत आहेत. काही प्लॅटफॉर्म आपल्या अ‍ॅप्स व संकेतस्थळांमध्ये मराठी पर्याय उपलब्ध करून देत आहेत.

सकारात्मक बदलाची नांदी

मराठी नाव हा केवळ भाषिक अभिमानाचा विषय राहिलेला नाही, तर तो व्यावसायिक ताकदीचा भाग ठरत आहे. स्थानिक संस्कृती, परंपरा आणि आधुनिक उद्योजकता यांचा संगम साधत ‘लोकल ते ग्लोबल’ हा मंत्र स्टार्टअप विश्वात रुजताना दिसतो आहे. तरुण उद्योजकांचा हा बदलता द़ृष्टिकोन भविष्यात मराठी ब—ँडिंगला अधिक बळ देणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news