विदेशात इस्रायल, मॉरिशसमध्ये गाजते मराठी

मराठी राजभाषा गौरव दिन विशेष
Marathi language Gaurav Day
मराठी राजभाषा गौरव दिन विशेष
Published on
Updated on
सचिन बनछोडे

कोल्हापूर : मायमराठी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील काही राज्यांमध्येही बोलली जाते. भारताच्या 22 अधिकृत भाषांमध्ये समाविष्ट असलेली आणि नुकतीच ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळालेली मराठी देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगामध्ये मराठी भाषिकांच्या संख्येवरून तिचा 19 वा क्रमांक लागतो. इस्रायल आणि मॉरिशस हे दोन असे देश आहेत जिथे मराठी बोलणारे लोक सर्वाधिक आहेत.

महाराष्ट्रातून जगाच्या कानाकोपर्‍यात जाणारा मराठी माणूस आपल्यासोबत शिवरायांचा जाज्वल्य अभिमान, मराठी संस्कृती आणि मराठी भाषेची गोडी सोबत घेऊनच जात असतो. त्यामुळे जगभरात अनेक ठिकाणी सध्या मराठी भाषिक लोक व त्यांचे विविध प्रसंगी साजरे होणारे मराठी उपक्रम पाहायला मिळतात. अमेरिकेत मराठी भाषिक लोकांची संख्या लक्षणीय आहे. विशेषतः न्यूजर्सी, कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत. हे लोक गणेश चतुर्थी, गुढीपाडवा व दिवाळीसारख्या सणांवेळी एकत्र येत असतात. तेथील मराठी संघटना आणि सांस्कृतिक मंडळे मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या जतनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. कॅनडामध्ये विशेषतः ग्रेटर टोरांटो एरियात मराठी भाषिक लोक अधिक आहेत.

मराठी बोलणारे अनेक व्यावसायिक व विद्यार्थी कॅनडात स्थायिक झाले आहेत. तिथेही मराठी लोक वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम, मराठी भाषेचे वर्ग आणि मराठी लोकांसाठीचे कार्यक्रम राबवतात. इंग्लंडमध्ये विशेषतः लंडन आणि लिसेस्टरमध्ये मराठी भाषिक लोकांची संख्या अधिक आहे. ऑस्ट्रेलियातही मराठी लोकांची संख्या मोठी आहे. सिडनी, मेलबोर्नसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने मराठी लोक आढळतात. तिथे ते सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी भाषेसाठी कार्यशाळा व उत्सवांचे आयोजन करतात. मध्यपूर्वेत विशेषतः संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया आणि कतारमध्येही मराठी लोक आहेत.

नोकरीच्या शोधात तिकडे गेलेले अनेक मराठी लोक तिथेही एकत्र येऊन आपली मराठी संस्कृती व भाषा जतन करतात. अन्यही अनेक देशांमध्ये मराठी लोक आहेत, मात्र सर्वाधिक मराठी भाषिक इस्रायल व मॉरिशसमध्ये आहेत. बेने इस्राएल या भारतीय ज्यू लोकांमध्ये मराठी बोलली जाते. 1948 च्या प्रारंभी हे लोक इस्राएलमध्ये स्थलांतरीत झाले आणि जाताना सोबत मायमराठीही घेऊन गेले. 1977 मध्ये तिथे अशा मराठी बोलणार्‍या लोकांची संख्या 20 हजार होती. इस्रायलच्या दिमोना व बीरशेबा येथे हे मराठी लोक अधिक आहेत. मॉरिशसमध्ये सन 1835 ते 1910 या काळात महाराष्ट्रातून 40 हजारांपेक्षा अधिक मजूरांना मॉरिशसमध्ये नेण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश कोकण किनारपट्टीवरील होते. पोर्ट लुईससारख्या अनेक शहरांमध्ये हे मराठी लोक आहेत. आजही या लोकांनी मराठी संस्कृती व भाषा जतन करून ठेवली आहे.

मराठमोळ्या आजींची लंडनमध्ये खानावळ

‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ या चरित्रात्मक पुस्तकातून किंवा पुलंच्या ‘अपुर्वाई’मधून ज्यांच्याविषयी माहिती मिळते त्या खानावळ चालवणार्‍या आजीबाई वनारसेही लंडनमध्येच राहत होत्या. भारतात इंग्रजी राजवट होती, त्यावेळेपासूनच इथे अनेक मराठी लोक राहत आले आहेत. गेल्या काही दशकांच्या काळात त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. ‘माझं लंडन’ लिहिणार्‍या मराठी लेखिका मीना प्रभू या लंडनवासीच आहेत. लंडनचे महाराष्ट्र मंडळ अनेक दशकांपासून प्रसिद्ध आहे.

सातासमुद्रापार मराठीचा बोलबाला

  • भारतात चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा

  • जगात मराठी भाषिकांच्या संख्येवरून तिचा 19वा क्रमांक

  • जगात इस्रायल, मॉरिशसमध्ये मराठी बोलणारे सर्वाधिक

  • अमेरिकेतील न्यूजर्स, कॅलिफोर्निया, टेक्सासमध्ये मराठी बोलणारे मोठ्या संख्येने

  • कॅनडातील ग्रेटर टोरंटो भागात मराठी भाषिक लोक अधिक

  • इंग्लंडमधील लंडन, लिसेस्टरमध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news