.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
इचलकरंजी : प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाची भूमिका आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. 23) कोल्हापुरात मराठा आरक्षण परिषद आयोजित केली आहे. दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राज्यातील विविध 42 संघटनांचे प्रतिनिधींचे चर्चासत्र होणार असल्याची माहिती या परिषदेचे निमंत्रक तथा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रदीर्घकाळापासून लढा सुरू आहे. मराठा आरक्षण हा राज्यातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा आरक्षण संघर्ष समिती, सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने राज्यभरात 50 पेक्षा अधिक मोर्चे काढले. याप्रश्नी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी लढा सुरू केला; मात्र शासनाकडून त्यांच्या आंदोलनाची म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 23 ) सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात मराठा समाज आरक्षणसंदर्भात प्रलंबित प्रश्न, पुढील भूमिका व दिशा ठरविण्यासाठी राज्यभरातील विविध 42 मराठा आरक्षण संघटनांचे पदाधिकारी, मराठा आरक्षण विषयावरील तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
या परिषदेत शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती विनायक मेटे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक, मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष, सुभाषदादा जावळे-पाटील, राष्ट्रीय मराठा महासंघ मुंबईचे अध्यक्ष, दिलीपदादा जगताप, शिवसंग्राम स्वराजचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे, मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे, शंभुराजे युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुनील मोरे, संभाजी बि—गेडचे अध्यक्ष संतोष पाटील, मराठा सेवामंडळ परभणीचे अध्यक्ष नितीन देशमुख, मराठा युवा संघटना प्रदेशाध्यक्ष नितीन डांगे-पाटील, भूमिहीन मराठा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पाटील, मराठा अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सचिन माने, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभियंता संघाचे प्रशांत पवार, मराठा आरक्षण संघटनेचे अध्यक्ष पी. एम. पाटील, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे विलास सावंत, कानसा वारणा फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील, अखिल भारतीय मराठा सेवासंघांचे विलासराव देसाई, मावळा जवान संघटनेचे दत्ताजीराव नलवडे, मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगरचे रविकुमार सोडतकर, शिवसंग्राम स्वराजचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे, छावा मराठा युवा महासंघटनेचे धनाजी येळकर पाटील, म. आ. समन्वय समितीचे गणेश काटकर, संभाजी सेनेचे रामेश्वर शिंदे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. शिवाजीराव महाडिक, मराठा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष भास्करराव जाधव, मराठा समाज सिंधुदुर्गचे एस. टी. सावंत, ताराराणी बि—गेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदना मोरे, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अशोक गावडे, महाराष्ट्र क्रांती सेनेचे भरत पाटील, संभाजी सेनेचे सुधाकर माने, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जगदिश जाधव, मराठा संघर्ष समितीचे दिग्विजय मोहिते, मराठा आरक्षण समिती रत्नागिरीचे समीर जाधव, वारकरी परिषदेचे अध्यक्ष नितीन सातपुते, छावा मराठा संघटनेचे संजय हारूगडे, मराठा समन्वय समितीचे चंद्रकांत सावंत, नवी मुंबई महाराष्ट्र क्रांती सेनेचे श्रीकांत शेळके, उत्तर महाराष्ट्र मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. पी. एस. पाटील व महाराष्ट्र क्रांती सेना, सांगलीचे अध्यक्ष ऋषीकेश साळुंखे उपस्थित राहणार आहेत.
हक्काच्या आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाने सुरू केलेल्या विविध आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने यापूर्वी आरक्षण जाहीर केले, त्याच्या अंमलबजावणीचा अध्यादेशही काढला. त्यानुसार एसईबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला. राज्य लोकसेवा आणि शासकीय, निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीत 10 टक्के आरक्षण दिले. मात्र, या अध्यादेशातही अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे हे आरक्षण मराठा समाजाला मान्य नाही. मराठा समाजाला कुणबी जातीच्या दाखल्यासह हक्काचे आरक्षण मिळावे याच मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे.