

कोल्हापूर : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे 25 आणि 26 नोव्हेंबर 1994 रोजी कोल्हापूरच्या दौर्यावर आले होते. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या 31 व्या दीक्षांत समारंभाला आणि त्यानंतर दुसर्या दिवशी भारतीय कृषी अर्थशास्त्र संस्थेच्या 54 व्या वार्षिक सभेला उपस्थिती लावली. दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि कृषी अर्थशास्त्र संस्थेच्या वार्षिक सभेचे अध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणाने त्यांच्या विद्वत्तेचे आणि प्रखर राष्ट्रभक्तीचे दर्शन कोल्हापूरकरांना घडले होते.
राजकारण परिवर्तनाचे साधन बनावे, अशी अपेक्षा डॉ. सिंग यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात व्यक्त केली होती. राजकारण हा केवळ सत्तेचा मार्ग न राहता तो सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन बनले पाहिजे. विद्यापीठे ही देशाच्या विकासासाठी राबणार्या तरुणांना गती देणारी केंद्रे बनवा, असे आवाहन त्यांनी केले होते.
विकास परदेशातून आयात करता येत नाही, असे सांगत डॉ. सिंग यांनी लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याच देशातील उपलब्ध आणि प्रचंड स्वरूपात असलेल्या मानवी साधनसामग्रीची एकत्रित रचना करावी लागेल, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली होती. आपल्या लोकांकडे नवनिर्मिती, साहस आणि उद्योजकतेचा प्रचंड साठा आहे. त्याच्या साहाय्याने अज्ञान, दारिद्य्र आणि रोगराईविरोधात संघर्ष करून हा साठा मिळवता येईल असे राजकीय, आर्थिक वातावरण तयार करण्याची गरज आहे. ही सर्व उद्दिष्टे गाठू असे नवे आर्थिक धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
दुसर्याच दिवशी दि.26 नोव्हेंबर रोजी शिवाजी विद्यापीठातच भारतीय कृषी अर्थशास्त्र संस्थेची 54 वी वार्षिक सभा झाली. या सभेचे अध्यक्षस्थान भूषवताना डॉ. सिंग यांनी कृषी क्षेत्रातील प्रतिकूल परिणांमावर आणि त्यातून कृषी क्षेत्राला पर्यायाने शेतकर्यांना समृध्द करण्यासाठी कराव्या लागणार्या उपाययोजना यावर अभ्यासपूर्ण मत मांडले होते. त्यातून त्यांनी त्यांच्यातील द्रष्टा अर्थतज्ज्ञ आणि कणखर देशभक्ताचे दर्शन घडवले होते.
या दौर्यात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या शिष्टमंडळाने त्यांना त्यांना निवेदन दिले होते. त्यावेळी राम मेनन, शिवाजीराव देसाई, महंमदसाहेब हुदली, पद्माकर सप्रे, दादासाहेब चौगुले, बाबुभाई हुदली, विजय देशपांडे, रामप्रसाद झंवर, प्रदीपभाई कापडीया, रमणिकभाई वाोरा, सतिश कल्याणशेट्टी आदींशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला होता. शिष्टमंडळानेही निवेदन दिले होते. यावेळी जयवंतराव मराठे, शिवलिंग पांढरे, एम. डी. सातपुते, मनोहर नवनाळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधान झाल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांची शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासदौर्यात भेट घेतली होती. यावेळी डॉ. सिंग यांंनी शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला होता.
या दोन दिवसांच्या दौर्यात डॉ. मनमोहन सिंग यांची कोल्हापुरात प्रकृती बिघडली. यामुळे त्यांना दि.26 नोव्हेंबर रोजी राज्य शासनाचे विशेष विमान मागवून मुंबईला हलवण्यात आले. मुंबईत काही काळ त्यांच्यावर उपचार करून नंतर त्यांना दिल्लीला हलवण्यात आले होते.