

कोल्हापूर : गुढीपाडव्यादिवशी डझनाला हजार रुपयावर गेलेला आंब्याचा दर आता शेकड्यात आला आहे. आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने आंब्याचे दर उतरू लागले आहेत. साधारणपणे दरात 40 ते 50 टक्के घट झाली आहे. 15 एप्रिलनंतर दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
महिनाभरापासून फळ बाजारात आंब्याची आवक सुरू झाली आहे; परंतु दर तेजीतच होते. गुढीपाडव्यादिवशी तर आंब्याचा भाव डझनाला हजारवर गेला. पाडव्यानंतर केरळ, आंध— प्रदेश, कर्नाटकमधील आंब्याची मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांत आवक झाल्यामुळे कोकणातील आंबा कोल्हापूरच्या बाजारात येऊ लागला. बाजार समितीत साडेतीन हजार बॉक्सची आवक नोंद झाली असली, तर प्रत्यक्षात कोल्हापुरात 5 हजार आंब्याच्या बॉक्सची आवक झाली आहे. पाच ते सहा डझनच्या पेट्यांची देखील आवक चांगली झाली आहे. सध्या डझन ते सव्वा डझन आंब्याच्या बॉक्सची किंमत 300 रुपये आहे. चांगल्या प्रतीच्या आंब्याचा बॉक्स 800 ते 900 रुपये झाला. पायरीचेही आगमन झाले आहे. साधारणपणे 400 ते 600 रुपये असा पायरीच्या बॉक्सचा दर आहे.
दि. 1 एप्रिल : 5000 बॉक्स, 60 पेट्या (5 ते 6 डझन)
दि. 2 एप्रिल : 6239 बॉक्स, 69 पेट्या (5 ते 6 डझन)
दि. 3 एप्रिल : 6474 बॉक्स, 90 पेट्या (5 ते 6 डझन)