कोल्हापूर : श्रावणाच्या सरी, मृद्गंधाचा दरवळ, पारंपरिक काठपदराच्या साड्या, हातात सूप, गाण्यांच्या ओव्या आणि झी मराठीच्या कलाकारांची उपस्थिती अशा उत्साही वातावरणात पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने आयोजित मंगळागौर सोहळा म्हणजे परंपरा, आनंद आणि जल्लोष यांचा अद्वितीय संगम ठरला. भर पावसातही महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हास्य, गाणी, खेळ आणि गौरी खेळांच्या स्पर्धांनी सजलेला हा सोहळा श्रावणातील मंगलमय वातावरणाला एक नवी उंची देणारा ठरला.
झी मराठीच्या देव माणूस मालिकेतील कलाकारांनी महिलांशी संवाद साधून सोहळ्यात रंगत आणली. अभिनेत्री मेघना झुंजुम यांच्या श्रावण सरी सणावरती या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गोकुळाष्टमी, मंगळागौर तसेच इतर पारंपरिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला आगळावेगळा उत्साह लाभला. या कार्यक्रमासाठी प्रत्येक सभासदाने पारंपरिक काठपदराची साडी नेसून हातात सूप घेतले होते. त्या सूपवर सामाजिक संदेश लिहून महिलांनी परंपरेसोबतच समाजजागृतीचा सुंदर संदेश दिला. उपस्थित सभासदांना गौरीची पावलं आणि हेअर अॅक्सेसरीज भेट म्हणून देण्यात आले. या सोहळ्याने महिलांच्या परंपरा, कला, उत्साह आणि ऐक्याचा संगम घडवून श्रावणोत्सव अधिकच संस्मरणीय केला. पारंपरिक मंगळागौर, नवनवीन कल्पना, समाजजागृती, आणि रंगीबेरंगी सादरीकरणांचा मनमोहक मेळ घालून कस्तुरी क्लबने महिलांच्या आनंदोत्सवाची नवी परंपरा रचली.
कार्यक्रमाचे प्रायोजक अग्रवाल गोल्ड आणि पायल क्रिएशन होते. अग्रवाल गोल्डचे सुशील अग्रवाल यांनी महालक्ष्मी व गणपतीची स्थापना केली होती, ज्यांना एक ग्राम सोन्याचे दागिने परिधान करून देखणी आरास सजवण्यात आली. या सोहळ्याची शोभा त्यामुळे अधिकच खुलून दिसली.
झी मराठीच्या कलाकारांचा प्रायोजक व सभासदांच्या वतीने सत्कार केला. प्रायोजकांचा सन्मानही सेलिबि—टींच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धकांना आकर्षक गिफ्ट देण्याची जबाबदारी पायल क्रिएशनने सांभाळली. याशिवाय प्रथम 300 महिलांना विशेष हेअरपीन भेट म्हणून देण्यात आले. पायल क्रिएशनचे रुपेश पुरोहित सपत्नीक उपस्थित होते.
जयश्री वळगडे : महालक्ष्मीला नेसवलेली साडी विजेती
सविता पाटील : ग्रुप लीडर लकी ड्रॉ विजेती
राजश्री बोडके : विशेष लकी ड्रॉ विजेती
मराठा मोळी पारंपरिक दागिने स्पर्धा
प्रथम क्रमांक : रेवती जगदाळे
द्वितीय क्रमांक : तृप्ती पोतदार
सविता पाटील ग्रुपने बहारदार सादरीकरण सादर करून विजेतेपद पटकावले. ग्रुप सदस्य : माधवी मोहिते, रुपाली भाट, तेजश्री पाटील, रश्मी चौगुले, वृषाली इंगवले