Asha Bhosale Kolhapur connection | कारेकरांची ती खोली... आणि आशाताईंचं बालपण!

कोल्हापूरशी भावनिक वीण कायमच घट्ट
Asha Bhosale Kolhapur connection |
कोल्हापूर : सूर्यकांत कारेकर यांचे हेच ते घर ज्या घरात आशाताईंचे बालपण गेले.
Published on
Updated on

कोल्हापूर : खरी कॉर्नरमार्गे मिरजकर तिकटीकडे जाणार्‍या रस्त्यावर आजच्या गणेश मंगल कार्यालय आणि शंभर वर्षांपूर्वीच्या हंस टॉकीजच्या समोरील सूर्यकांत कारेकर यांचं घर. या घरातील एका आठ बाय दहाच्या खोलीत 1940 साली मंगेशकर कुटुंबीय भाड्याने राहत होते. भाडे होते दरमहा 10 रुपये. वडील दीनानाथ, आई माई यांच्यासह भगिनी लता, मीना, उषा आणि बंधू हृदयनाथ यांच्यासोबत आठ वर्षांच्या आशा राहायला इथे आल्या. त्यानंतर नऊ वर्षे आशाताईंचे बालपण याच घरात गेले.

संगीत क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी ताई मुंबईला गेल्या, पार्श्वगायनात यशस्वी झाल्या... मात्र कोल्हापुरातील कारेकरांच्या घरातील ती एक खोली, शालेय शिक्षण घेतले ते विद्यापीठ हायस्कूल, सणासाठी बांगड्या भरायला जाणारे माहेर बँगल्स हे दुकान, बाबुराव पेंटर यांच्या घरी त्यांच्या मुलींसोबत घालवलेले क्षण या आठवणींची शिदोरी आशाताईंनी अखेरपर्यंत जपली. कोल्हापुरात आल्यानंतर आशाताई या सगळ्या ठिकाणी भेट द्यायच्या आणि ते क्षण भरभरून जगायच्या.

मंगेशकर कुटुंबातील पाचही भावंडांनी जगभर कीर्ती मिळवली. जगाच्या कानाकोपर्‍यात त्यांची ओळख आहे; पण त्यांच्या लहानपणीच्या खडतर काळात कोल्हापुरात त्यांना मोठा आधार ठरला. 1940 च्या सुमारास सोळा रुपये घरभाडे न परवडल्याने माई मंगेशकर घराच्या शोधात होत्या. एकदा बोलण्याच्या ओघात माईंनी हिराबाई कारेकर यांना घरभाडे परवडत नसल्याने दुसर्‍या ठिकाणी घर मिळेल का, अशी विचारणा केली. यावर त्यांनी पती लक्ष्मण कारेकर यांच्याशी यांच्याशी बोलून केवळ 10 रुपयांत स्वतःच्या घराचा तिसरा मजला मंगेशकर कुटुंबीयांना भाड्याने दिला. 1948 पर्यंत हे कुटुंब कारेकर यांच्या घरी राहत होते. आशा भोसले यांचे कोल्हापूरला येणे झाले की, कितीही व्यस्त नियोजन असले, तरी आशाताई कारेकरांच्या घरी जात. कुटुंबातील प्रत्येकाची आस्थेने चौकशी करत.

त्यानंतर कोणालाही घर भाड्याने दिले नाही

कारेकर आणि मंगेशकर कुटुंबाचा ऋणानुबंध इतका द़ृढ झाला की, जेव्हा पुढील सांगितिक कारकिर्दीसाठी हे कुटुंब मुंबईला गेल्यानंतर रिकामे झालेले घर कारेकर कुटुंबाने कोणालाही भाड्याने दिले नाही. मंगेशकर कुटुंबातील सर्व भावंडांची जगभरात कीर्ती पोहोचली. मात्र, त्यांच्या जेमतेम परिस्थिती असलेल्या काळातील आठवणी आणि कोल्हापूरशी जुळलेली नाळ कारेकर कुटुंबानेही तितक्याच आत्मियतेने जपल्याची ही खूण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news