

आजरा : आजाराला कंटाळलेल्या पतीने दवाखान्यात नेत असताना दुचाकी थांबवून पत्नी आणि भाच्यासमोरच चित्री नदीत उडी घेतली. गुणाजी गोविंद खामकर (49) असे त्यांचे नाव आहे. पोळगाव (ता. आजरा) येथे ही घटना घडली. शोध घेतला असता ते सापडले नाहीत.
गुणाजी हे मुंबई येथे सुरक्षारक्षकाची नोकरी करत होते. ते किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. 8 दिवसांपूर्वी ते गावाकडे आले असून गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. शुक्रवारी दुपारी भाचा संदीप धनवडे व पत्नी अर्चना त्यांना आजरा येथे दवाखान्यात घेऊन जात होते. पोळगाव पुलावर गुणाजी यांनी पाय दुखत आहे, असे सांगत दुचाकी थांबवण्यास सांगितली. याचवेळी अचानक त्यांनी पुलावरून नदीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार समीर माने, सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी भेट दिली.