

सतीश सरीकर
कोल्हापूर : रोज सूर्य उगवायच्या अगोदर पहाटे 5.30 घरातून बाहेर पडायचे. एकेक बंगला, हॉटेल असे माळीकाम करत फिरायचे. दुपारी असेल तिथे बायको डबा घेऊन आल्यावर कुठेतरी बसून जेवायचे. रात्री 8 वाजता घरी परत यायचे. दिवसभर काबाडकष्ट करायचे. माळीकामाच्या कष्टातून जगणारे तुकाराम खोंदल (वय 47, रा. कदमवाडी) हे फक्त उद्यानांना फुलांनी सजवणारा माणूस नाही, तर चार मुलींच्या स्वप्नांना फुलवणारा जीवंत प्रेरणास्रोत आहे. 11 नोव्हेंबरला वुडलँड हॉटेलमध्ये बिबट्याच्या जबड्यातून वाचलेला बाप आपल्या मुलींच्या स्वप्नासाठी जगणारा हिरो ठरला आहे.
अथक परिश्रम, न थकणारी जिद्द आणि मुलींसाठी सर्वस्व झोकून देणारा वडिलकीचा हा संघर्ष आहे. हातावर चटके, पायात माती आणि अंगावर उन्हाची झळ असली तरी त्यांच्या मनात मुलींसाठी प्रेमाचा अथांग सागर आहे. ‘इच्छा असुनही मी शिकू शकलो नाही, पण माझ्या मुलींनी शिकायला पाहिजे’, या एका वाक्यात त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण अर्थ दडलेला आहे. हातांनी फुलं फुलवणारा हा बाप आपल्या मुलींच्या भवितव्यासाठी घामाच्या थेंबांनी त्यांचे भविष्य सिंचित करत आहे.
खोंदल यांनी करंजफेन येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे शिक्षण घेण्याची इच्छा होती, पण घरची आर्थिक स्थिती नव्हती. वडील शेतमजूर, आई घरकाम करणारी. त्यामुळे अभ्यासाऐवजी कामाला जावे लागले. सन 2000 साली संगीता यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर कोल्हापुरात स्थायिक झाले. त्यांना चार मुली आहेत. खोंदल यांनी त्यांच्या हातांनी जोपासलेली फुलं उद्यानात फुलतात, पण त्यांच्या जिद्दीने जोपासलेली मुलींची स्वप्नं आज त्यांच्या आयुष्याचा खरा बहर ठरली आहेत. खोंदल यांचे जगणे म्हणजे आयुष्याशी केलेली झुंज. त्यांनी स्वतःचे बालपण गरिबीत काढले, पण चार मुलींचे भविष्य ज्ञानाने, संस्कारांनी आणि मेहनतीच्या मूल्यांनी श्रीमंत करत आहेत.
...आणि जीवात जीव आला
मी रूईकर कॉलनील घरकामाला जाते. 11 नोव्हेंबरला दुपारी 12.30 वाजता प्रियाकांने पप्पांवर बिबट्याने हल्ला केल्याचे फोनवरून घरमालकांना सांगितले. घरमालकांनी लगेच मला घरी सोडले. दारातली गर्दी बघून काळजात धस्स झाले. भोवळ आली, बेशुध्द पडले. काहीवेळाने शुध्दीवर आले. अंगाची थरथर वाढली होती. सीपीआरमध्ये त्यांना जीवंत बघितल्यावर जीवात जीव आला, असे पत्नी संगिता खोंदल यांनी सांगितले.
पप्पांचा जीव म्हणजेच आमचे जगणे...
या कुटुंबात श्रीमंती नाही, पण प्रेम आणि आदर ओसंडून वाहतो. पप्पा रोज थकून घरी आले तरी आमच्यासाठी नवा उत्साह घेऊन येतात. गरिबी म्हणजे हार नाही, ती तर लढण्याची ताकद आहे, असे त्यांनी आम्हाला शिकवले आहे. पप्पांचा जीव म्हणजेच आमचे जगणे आहे. पप्पांनी आमच्यासाठी सगळे दिले, आता आम्ही त्यांच्या आयुष्याला दिलासा देणार, असे मुलींनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाण्याऐवजी आत्मविश्वास दिसला.
शिक्षण हीच खरी संपत्ती
‘मला शिकायला मिळाले नाही, पण मुलींना शिकवणारच’, हा निर्धार खोंदल यांनी केला होता. प्रियांका, सारीका, रुपाली आणि दिपाली या चार मुलींचे शिक्षण हाच त्यांचा जीवनमंत्र आहे. त्यांनी आपल्या घामाचे थेंब रुपयांमध्ये बदलून मुलींना शिक्षणाची शिदोरी दिली. कधी शाळेची फी भरण्यासाठी दिवसाला दोन ठिकाणी काम, तर कधी रात्री बागेची निगा राखण्याचे काम केले. पण मुलींच्या शिक्षणात कधी तडजोड केली नाही. आज त्या मुली त्यांच्या स्वप्नांना न्याय देत आहेत.