

शिरोली : जीम चालकाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणास कपडे काढून लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी तसेच स्टीलच्या बाटलीने मारहाण केल्याची घटना शिरोली परिसरात घडली. शक्ती भोसले (वय 32, रा. शाहूपुरी, चौथी गल्ली) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. त्याने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
राज कोरगावकर याची कनाननगर येथे जिम आहे. या जिममध्ये राजचा मित्र शक्ती भोसले नियमित व्यायामासाठी येत असे. या ओळखीतून राजच्या पत्नीशी शक्तीचे आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या रागातून राजचा भाऊ आकाश कोरगावकर (रा. न्यू पॅलेस, कोल्हापूर) याने गुरुवारी (दि.16) दुपारी तीनच्या सुमारास सांगली फाटा येथील कोरगावकर पेट्रोल पंपावर शक्ती भोसले यास खोलीत नेले. त्याला ‘तू माझ्या भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवलेस, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलेस’ असे म्हणून मारहाण केली. मारहाणीदरम्यान भोसले याच्या पत्नीला देखील धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ही फिर्याद घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजे शनिवारी पोलिसांत दाखल करण्यात आली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहेत.