

कोल्हापूर : हातउसणे घेतलेल्या ८० रुपयांसाठी मित्रानेच मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये इंद्रजित धोंडिराम पोवार (वय ३०, रा. सणगर गल्ली, मंगळवार पेठ) जखमी झाला असून, त्याच्या डोक्यासह, चेहऱ्यावर गंभीर वार झाले आहेत. याप्रकरणी संशयित प्रमोद आनंदराव घोरपडे (वय ५०, मूळ रा. लाड चौक, मंगळवार पेठ ) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.
संशयित प्रमोद घोरपडे व जखमी इंद्रजित पोवार हे दोघे मित्र आहेत. प्रमोद बेघर असून, तो मिरजकर तिकटी परिसरातील महसूल भवनच्या पडक्या इमारतीमध्ये राहण्यास आहे. इंद्रजित पोवारने महिन्याभरापूर्वी प्रमोदकडून ८० रुपये हातउसणे घेतले होते. या बदल्यात प्रमोद ६०० रुपयांची मागणी करत होता. यातून या दोघांमध्ये मिरजकर तिकटी परिसरात मंगळवारी रात्री वादावादी झाली.
यावेळी एका पिशवीत लपवलेला कोयता प्रमोद घोरपडे याने अचानक बाहेर काढला. समोर थांबलेल्या इंद्रजितच्या चेहऱ्यावर त्याने वर्मी घाव घातला. डोके, कान व गालावर झालेल्या या वारामुळे जवळपास २० टाके इंद्रजीतच्या चेहऱ्यावर पडले आहेत. त्याच्यावर सीपीआरच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संशयित प्रमोदला पोलिसांनी पहाटेच्या सुमारास अटक केली.