

जयसिंगपूर : सांगली - कोल्हापूर महामार्गावरील धर्मनगर जवळील कोंडीग्रे फाटा येथे पूर्ववैमनस्यातून आणि पत्नीला पळवून नेल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला गाडीत घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आरिफ हुमायुन हेरवाडे, अनिस हुमायुन हेरवाडे यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर सलीम मुजावर (वय ३१, रा. आलास, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १९) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कोंडीग्रे फाटा येथे फिर्यादी समीर मुजावर याने आरिफ हेरवाडे यांच्या पत्नीला पळवून नेल्याच्या कारणातून राग मनात धरून संशयित आरोपी आरिफ हेरवाडे, अनिस हेरवाडे (दोन्ही रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), नूरमुहमद इब्राहिम शेख, सरफराज इकबाल कोल्हापुरे, रेहान कोल्हापुरे, जहीर कोल्हापुरे, फिरोज आणि इतर १० ते १५ जणांंनी फिर्यादी समीर यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. तसेच त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने गाडीत कोंडण्याचा प्रयत्न केला.
या मारहाणीदरम्यान संशयित आरोपींनी फिर्यादी समीर यांच्याकडील ८९ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. शिवाय घटनास्थळी असलेल्या कारची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेनंतर समीर मुजावर यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.