

कोल्हापूर : न्यायाच्या दरबारातच सुनावणीवेळी फिर्यादीच शस्त्र घेऊन आला अन् कोल्हापूरच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले. कोल्हापूर शहरात कायद्याचे राज्य असल्याचे सांगितले जात असले तरी गेल्या काही दिवसांतील घटना पाहता सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सामान्यांच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या यंत्रणांमध्ये मोठ्या त्रुटी असल्याचे समोर आले आहे. न्यायमंदिरात शस्त्र धडकले आणि कोल्हापूर शहराच्या सुरक्षेचे बुरुज ढासळले.
‘शस्त्र कोर्टात अन् सुरक्षा घोशात’ अशी स्थिती निर्माण झाली. पोलिस प्रशासनाची कार्यपद्धती व क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षेचा असा भेद झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. न्यायालयसारख्या संवेदनशील परिसरात फिर्यादी रिव्हॉल्व्हरसह प्रवेश करू शकतो, ही बाब नक्कीच धक्कादायक आणि सुरक्षा यंत्रणांसाठी लज्जास्पद ठरली आहे. जिल्हा न्यायालय परिसरात दररोज अनेक आरोपी, वकील, न्यायाधीश, पोलिस अधिकारी आणि नागरिकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी एखादा व्यक्ती शस्त्रासह फिरत असेल तर ही बाब सामान्य न ठरता संपूर्ण यंत्रणेची निष्क्रियता म्हणावी लागेल. जिल्हा न्यायालयात रिव्हॉल्व्हर घेऊन आलेल्या सुरेश संभाजी नरके (42, रा. वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त केले. या घटनेनंतर वकिलांनीही जर फिर्यादी बंदूक घेऊन न्यायालयात येत असेल तर उद्या आमच्यावरच हल्ल्याचा धोका आहे. आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित केला.
या प्रकरणानंतर न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचार्यांचीही सुरक्षा धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालय परिसर हा सर्वोच्च सुरक्षेच्या झोनपैकी एक मानला जातो. तरीदेखील अशा ठिकाणी सुरक्षेचा फज्जा उडाला, तर सामान्य माणसाच्या सुरक्षेची काय ग्वाही राहणार, अशी विचारणा केली जात आहे. जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पोलिसांकडून नेमण्यात आलेल्या कर्मचार्यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते का, त्यांच्याकडे आधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत का, की केवळ काठी आणि डोळ्यावर भरवसा ठेवून सुरक्षा दिली जाते, हे सर्व प्रश्न आता पुढे आले आहेत.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत पाच हजारांवरच शस्त्र परवानाधारक आहेत. कर्नाटक सीमेवर असलेल्या कोल्हापूरपासून कोकण, गोवा जवळ असल्यामुळे अवैध धंदे फोफावत आहेत. गुंड, गुन्हेगारांकडे हजारो बेकायदेशीर हत्यारे आहेत. उत्तर प्रदेश, बिहारसह इतर राज्यातून अक्षरशः 20 ते 50 हजारांत रिव्हॉल्व्हर आणली जातात. दहशतीसाठी शस्त्रांचा वापर केला जात आहे. एकूणच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात घातक शस्त्रांची तस्करी वाढली आहे.