

कोल्हापूर : कोल्हापूरचे सुपुत्र, उद्योजक व भारतीय सैन्यदलाचे माजी अधिकारी मेजर संजय शिंदे यांना भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते पुणे येथील दक्षिण कमांड मुख्यालयात भारतीय सैन्यदलाचा सर्वाधिक प्रतिष्ठेचा ‘व्हेटरन अचिव्हर्स अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. हा अॅवॉर्ड निवृत्तीनंतर राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात असामान्य योगदान देणार्या माजी सैनिकांना दिला जाणारा भारतीय सैन्यदलाचा सर्वोच्च सन्मान आहे.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी प्रशस्तिपत्रात म्हटले आहे की, भारतीय सैन्यदलाचे माजी अधिकारी मेजर संजय शिंदे यांनी निवृत्तीनंतरही कर्तव्यनिष्ठा, व्यावसायिक उत्कृष्टता व सेवाभाव यांचे सर्वोच्च आदर्श जपले आहेत. राष्ट्रहिताला सदैव प्राधान्य देत त्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये अमूल्य योगदान दिले. ते माजी सैनिक तथा सर्वसामान्य नागरिकांसाठी आदर्श ठरले आहेत. राष्ट्रासाठी दिलेल्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करतो. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मेजर शिंदे म्हणाले, गेल्या 30 वर्षांतील माझ्या सेवानिवृत्तीनंतच्या प्रवासाला आणि कार्याला भारतीय सैन्यदलाने इतक्या मोठ्या सन्मानासाठी पात्र मानले, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि कृतज्ञतेची बाब आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासात इंटिग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस ऑफ इंडियातर्फे एखाद्या माजी सैनिकाला प्रदान करण्यात आलेला हा पहिलाच सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे.