

इचलकरंजी : नगरपालिकेच्या स्थापनेपासूनच नगरपालिकेवर काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून पालिकेची सत्ता कायम ठेवली. यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचत होते; मात्र महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी या पक्षांसह मित्रपक्षांनी स्वत:च्या पक्षाच्या चिन्हाऐवजी एक चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच ही महत्त्वाची चिन्हे गायब होणार असल्याचे वास्तव आहे.
तत्कालीन काळात काँग्रेस हा पक्ष मोठा असल्यामुळे इतर पक्षांना नगरपालिकेच्या सत्ता स्थापनेत फारसा वाव नव्हता. काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली. काही दशके हीच परिस्थिती नगरपालिकेच्या राजकारणात होती.
कालांतराने राजकीय परिस्थिती बदलत गेल्यानंतर अपक्षांसह काही पक्षांचे नगरसेवक नगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय झाले. कामगार प्रश्नावरून संघर्ष आणि आंदोलनातून काही नेतृत्व पुढे आले आणि त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले. काही काळानंतर भाजपचेही मोजके नगरसेवक निवडून येत होते. पालिकेच्या सत्तेत अपक्षांना फार कमी संधी मिळाली. पालिकेच्या राजकारणात अनेक वर्षे आवाडे घराण्याचाच दबदबा होता. या घराणेशाहीला कंटाळून काही नगरसेवकांनी बंड करून विरोधकांशी हातमिळवणी करून सत्ता हस्तगत केली.
इचलकरंजी विधानसभेची 2019 मध्ये झालेली निवडणूक खर्याअर्थाने राजकारणाला नवी दिशा देणारी ठरली. त्यानंतर काँग्रेसच्या बरोबरीने भाजप-शिवसेना आघाडीने नगरपालिकेच्या राजकारणात एन्ट्री केली. मध्यंतरीच्या काळात समविचारी पक्षांनी एकत्र येत शहर विकास आघाडीचा प्रयोगही राबवला. तोही यशस्वी ठरला; मात्र या सर्व राजकारणात प्रमुख राजकीय पक्षांची चिन्हे ही मतदारांसमोर निवडणुकीच्या माध्यमातून कायमपणे होती. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचा हात, राष्ट्रवादीचे घड्याळ, शिवसेनेचा धनुष्यबाण, भाजपचे कमळ यांचा समावेश होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल ही दोन चिन्हे नव्याने मिळाली. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत ही सर्व चिन्हे पाहायला मिळतील, अशी अपेक्षा होती.
राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही या तीन पक्षांचीच बहुतांश ठिकाणी सत्ता आली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडीनेही काही ठिकाणी नवीन प्रयोग केला आहे. इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीतही सत्ताधार्यांना रोखण्यासाठी शिव-शाहू विकास आघाडी अस्तित्वात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदींसह मित्रपक्षांची मोट बांधण्यात आली आहे. एक विचार आणि एकच चिन्ह हा त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे नेहमीच्या निवडणुकीत दिसणारा विविध पक्षांची चिन्हे या निवडणुकीतून गायब होणार आहे. शिव-शाहू विकास आघाडीने ‘शिट्टी’ हे चिन्ह राखीव ठेवले आहे. या चिन्हाबरोबरच ‘कपबशी’ आणि ‘गॅस शेगडी’ या चिन्हाबाबतही आघाडी आग्रही आहे. त्यामुळे या आघाडीला कोणते चिन्ह मिळणार, हे चिन्ह वाटपावेळीच स्पष्ट होणार आहे. चिन्ह वाटपानंतरच प्रमुख पक्षांच्या चिन्हाऐवजी कोणते चिन्ह यावेळी मतदारांसमोर जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.