

कोल्हापूर ः कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदाची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट सामन्यामुळे चुरशीची होणार आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे महायुतीच्या बाजूने एकत्र येत असून, महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सहभागी आहेत. आगामी निवडणुकीत एकेकाळी मनपात एकत्र काम करणारे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे नेते आता एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याची शक्यता आहे.
पाच वर्षांच्या प्रशासकीय कालखंडानंतर निवडणुका होत असून, या काळात अनेक इच्छुक कार्यकर्ते तयार झाले आहेत. आरक्षण प्रक्रियेतील विलंबामुळे निवडणुका लांबल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे.कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मनपाचे एकूण 81 प्रभाग येतात. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात 53, तर कोल्हापूर दक्षिणमध्ये 28 प्रभाग आहेत. सध्या या भागांचे विधानसभेतील प्रतिनिधीत्व शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर आणि भाजपचे अमल महाडिक हे करत आहेत. गेली 15 वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील असा संघर्ष महापालिकेच्या राजकारणात सुरू आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली. महायुतीत सामील झाल्यामुळे हसन मुश्रीफ यांना महायुतीचीच सोबत द्यावी लागणार आहे. मुश्रीफ यांना सतेज पाटील यांच्याऐवजी महाडिक यांच्यासह महायुतीच्या बेरजेच्या राजकारणासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
दुसरीकडे काँग्रेस, शरद पवार गट व उद्धव ठाकरे गट एकत्र येऊन महाविकास आघाडीसाठी लढण्याची शक्यता आहे. इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू असून, उमेदवारी न मिळाल्यास अनेक कार्यकर्ते ‘मित्रपक्ष’ म्हणून स्वतंत्र लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपा निवडणुकीत चुरशीबरोबरच राजकीय धुरळाही उठणार आहे.
महापालिकेच्या या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरीट असलेल्या उमेदवारांसाठी राजकीय पक्ष गळ घालत आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इलेक्टिव्ह मेरीट असलेल्यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत ठेवली असून, त्यांनी अशा उमेदवारांना पायघड्या घालायला सुरुवात केली आहे. राजकीय वार्याची दिशा बघूनच असे उमेदवार सावध पावले टाकत आहेत.