

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून पाच-सात वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेल्यामुळे या निवडणुकीत सहकारातील मित्र एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्यात मिळालेले अभूतपूर्व यश पाहता येत्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीला रोखण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आहे.
मावळत्या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व होते. यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आ. सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. परंतु तीन साडेतीन वर्षांत राज्यातील घडामोडींमुळे आणि प्रमुख पक्षात फूट पडल्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावरही झाला आहे. पूर्वी आमदार सतेज पाटील यांनी काही वर्षांपासून महाडिक विरोधी भूमिका घेत जिल्ह्यातील सर्व नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामध्ये त्यांना यश देखील आले आहे. त्यावेळी राजकीय परिस्थितीदेखील त्यांना साथ देणारी किंवा पोषक होती. आता ती परिस्थती राहिलेली नाही.
प्रथम शिवसेनेत पडलेल्या फुटीमध्ये शिवसेनेचे ताकदवान नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ताकदवान नेते अजित पवार यांच्या सोबत गेले. त्यामुळे जिल्ह्यात महायुती अतिशय भक्कम झाली आहे. जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे सतेज पाटील यांचा दोस्ताना संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. दोघांचेही पक्ष एकाच आघाडीत असल्यामुळे त्यांना काही अडचण येत नव्हती. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर दोघांचे वर्चस्व असायचे. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर मात्र मुश्रीफ-पाटील यांच्यावर थोड्या पक्षीय मर्यादा आल्या आहेत.
मुश्रीफ महायुतीचे नेते आहेत तर पाटील आता महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते आहेत. त्यामुळे यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुश्रीफ व पाटील एमेकांच्या विरोधात दिसणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची जबाबादीर काँग्रेसवर म्हणजे आमदार सतेज पाटील यांच्यावर येणार आहे. महायुतीचे जिल्ह्यात दोन मंत्री आणि दहा आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे मात्र सतेज पाटील वगळता ताकदवान फारसे कोणी नाही. त्यामुळे महायुतीला रोखणे महाविकास आघाडीपुढे मोठे आव्हान आहे.
महायुतीची ताकद : पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, प्रकाश आवाडे.
महाविकास आघाडीची ताकद : खा. शाहू महाराज, आ. सतेज पाटील, राहुल पी. एन. पाटील, समरजितसिंह घाटगे, राजूबाबा आवळे, सत्यजित पाटील-सरुडकर, व्ही. बी. पाटील, नंदाताई बाभूळकर.