

कोल्हापूर : महायुतीच्या सरकारच्या वेगवान निर्णयामुळं कामांचा निपटारा होत आहे. नियोजनबद्ध विकास होत असल्यामुळं जनतेचा महायुतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला कोल्हापूरची जनता महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करून कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेची चावी महायुतीच्या हाती देईल, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 7 मधील जोशी गल्लीमध्ये आयोजित विजय निर्धार सभेत ते बोलत होते. शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग््रेास महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 7 मध्ये विजय निर्धार मेळावा आयोजित केला होता. या प्रभागातून विशाल शिराळे, दीपा ठाणेकर, मंगल साळुंखे आणि ऋतुराज क्षीरसागर हे महायुतीकडून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी जोशी गल्ली चौकात मतदारांच्या अलोट उत्साहात सभा झाली.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अंकुश निपाणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, बंटी जाधव, हर्षल सुर्वे यांनी शासनाच्या योजनांची माहिती देत प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्यामुळं महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणता येईल. त्यासाठी महापालिकेची सत्ता महायुतीकडं पाहिजे, असं माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी नमुद केलं. कोल्हापूरच्या जनतेने ही निवडणूक हाती घेतलीय. मतदारांनी महायुतीला सत्ता देण्याचं निश्चित केलंय, असा दावा उमेदवार ऋतुराज क्षीरसागर यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या त्रिदेवांनी राज्याला प्रगतीची दिशा दाखवल्याचं महेश जाधव यांनी सांगितलं. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू असलेला विकासाचा वेग कोल्हापूरच्या जनतेला पसंत पडलाय. त्यामुळं कोल्हापूरची जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात महायुतीच्या उमेदवारांच्या नावापुढील बटण दाबून कोल्हापूरची जनता महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करेल आणि महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या महायुतीच्या हाती देईल, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री प्रकाश अबिटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भगिनी मंचच्या वैशाली क्षीरसागर, माजी नगरसेवक निशिकांत मेथे, जितू सलगर, किरण शिराळे, इंद्रजित आडगुळे, किशोर घाटगे, अनिल पाटील, भरत काळे, उदय भोसले, सुनील पाटील, अमेय भालकर, विपुल भंडारे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.