

कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच आम्ही लढणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. जागावाटपाचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिघे मिळून कौशल्याने सोडवतील, यामध्ये कसलीही अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर दौर्यात त्यांनी ‘पुढारी’ प्रतिनिधीशी बोलताना निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली. लोकसभेच्यावेळी थोडे इकडे तिकडे झाले. मात्र, त्याचा अनुभव आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही अत्यंत जागरूकपणे सगळ्या गोष्टीतून मार्ग काढला. जागा वाटपाचा मुद्दा तेव्हाही होताच. मात्र, तीनही नेत्यांनी एकत्रित बसून योग्य पद्धतीने जागावाटप घडवून आणले. त्याचा फायदा झाल्याचे सांगून पाटील म्हणाले की, भाजपला या निवडणुकीत 132 जागा मिळाल्या. त्यामुळे योग्य पद्धतीने जागावाटप झाले की त्याचे निकाल अनुकूल येतात हे स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या पातळीवर जागावाटपाचा मुद्दा थोडा कठीण बनतो. कार्यकर्त्यांना शब्द दिलेला असतो, निवडणूक कार्यकर्त्यांची असते, यातून मार्ग कसा काढणार, असे विचारता पाटील यांनी विधानसभेला मार्ग निघाला तसाच याहीवेळी निघेल आणि महायुतीची राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापन होईल, असा दावाही त्यांनी केला. आपण सातत्याने कोल्हापूर, सांगली येथील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आहोत. महायुतीला चांगले यश नक्कीच मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरबाबत बोलताना पाटील यांनी जनतेची सर्किट बेंचची गेली कित्येक वर्षांची मागणी आता पूर्ण होत आहे. कोल्हापूरचा टोल महायुतीच्या सरकारने हटविला. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले. अंबाबाई व जोतिबा देवस्थान परिसराचा विकास होत आहे. या विकासकामांमुळे जनतेमध्ये चांगले वातावरण आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.