

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली ताकदीने लढण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शासकीय विश्रामधाम येथे शनिवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नियोजन समितीमधील निधी वितरणाचा फॉर्म्युला ठरविण्यात आला. यात 30 टक्के पालकमंत्री व 70 टक्के आमदार असे सूत्र ठरले असल्याचे समजते.
बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे चार महिन्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. प्रशासकीय पातळीवर त्याची सुरुवात करण्यात आली आहे. पक्षीय पातळीवरदेखील आता या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. प्रत्येक पक्षाने आपापली तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या वतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांची शनिवारी शासकीय विश्रामधाममध्ये बैठक झाली.
या बैठकीमध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुका एकत्रिपपणे लढण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जागा वाटपावरून मतभेद होणार नाहीत, याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक असल्याचे मत या बैठकीत मांडण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि निधीबाबतही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये निधी वितरणाचा फॉर्म्युला ठरविण्यात आला तसेच दि. 23 जून रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याचे ठरले. जिल्हा नियोजनमधील निधी वाटपावरून नेहमी वादाचे प्रसंग घडत असतात; परंतु यावेळी जिल्ह्यात सर्वच आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना समान निधी देण्याचे ठरविण्यात आले. पालकमंत्री यांना मात्र 30 टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजच्या बैठकीत विविध शासकीय समित्यांवर कोणत्या पक्षाला किती जागा, यावरही चर्चा झाली. राज्य पातळीवर शासकीय समित्या व महामंडळांवरील प्रतिनिधित्वाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. राज्यामध्ये शासकीय समित्यांबाबत भाजप 48 टक्के, शिवसेना 29 टक्के व राष्ट्रवादी अजित पवार गट 23 टक्के असा फॉर्म्युला ठरला आहे. तोच फॉर्म्युला जिल्ह्यातदेखील राबविण्याचे ठरविण्यात आल्याचे समजते.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने व आमदार शिवाजी पाटील हे बैठकीस अनुपस्थित होते.