

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत महायुतीमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जागावाटपासंदर्भात चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील महायुती नेत्यांमध्ये जागावाटपाबाबात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. मुंबईत वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतरच गोकुळच्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सहायक निबंधक दुग्ध यांच्याकडे गोकुळने 5 हजार 470 संस्था सभासदांची यादी सादर केली आहे. दुग्ध विभागाकडून सध्या यादीची छाननी सुरू आहे. छाननीनंतर पात्र दूध संस्था सभासदांकडून प्रतिनिधींच्या नावे ठराव मागविण्यात येतील. यानंतर प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. यादीवर हरकती मागितल्या जातील. हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि राज्यसभेवरील खासदारांची निवडणूक यामुळे जिल्ह्यातील महायुतीचे नेते मुंबईतच व्यस्त आहेत; तर गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यात सध्या विविध पद्धतीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ग््राामीण भागात आपापल्या परीने सर्वजण गोकुळमधील आघाड्यांबाबत अंदाज बांधत आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघानुसार कोणता नेता कोणासोबत राहणार, महायुती व महाविकास आघाडी अशी निवडणूक झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार सतेज पाटील यांचे लक्ष
गोकुळमध्ये कशा पद्धतीने आघाड्या होणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. अशा पद्धतीने निवडणूक झाल्यास महायुतीमध्ये जागावाटपादरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीतील उट्टे निघण्याची शक्यता आहे. यामधून काहीजण नाराज होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत जि.प. निवडणुकीवरून महायुतीमध्ये काहीजण नाराज आहेत. त्यामुळे अशा नाराजांवर आमदार सतेज पाटील यांची यंत्रणा लक्ष ठेवून असणार आहे.