

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याचे स्पष्ट संकेत आहेत. भाजपची संघटनात्मक ताकद, शिवसेनेची पारंपरिक मतपेढी आणि राष्ट्रवादीची स्थानिक पातळीवरील पकड लक्षात घेता जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच झाली होती. बुधवारी (दि. 24) पुण्यात तिन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन महायुतीतील जागावाटपाचा ‘फॉर्म्युला’ निश्चित करण्यात आला. भाजपला 34 जागा, शिवसेनेला 32 जागा आणि राष्ट्रवादीला 15 जागा, असा ‘फॉर्म्युला’ बैठकीत ठरवून त्याला सहमती देण्यात झाली, असे विश्वसनीय वृत्त आहे.
भाजपने ‘मोठा भाऊ’ म्हणून अधिक जागांची मागणी केली होती, तर शिवसेनेने शहरातील पारंपरिक प्रभावाचा दाखला देत समसमान वाटपाचा आग्रह धरला होता. राष्ट्रवादीने मात्र मर्यादित जागा स्वीकारून काही ठराविक प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखल्याचे समजते. पक्षीय पातळीवर प्रत्येक प्रभाग आणि उमेदवार यावर काथ्याकूट करण्यात आला. दरम्यान, 2015-2020 मधील महापालिका सभागृहात भाजप 13, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 15 नगरसेवक होते. त्या तुलनेत भाजप, शिवसेनेला मोठी झेप मिळाल्याचे स्पष्ट होते.
महायुतीतील हा फॉर्म्युला अंतिम झाल्याचे जरी सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्ष उमेदवार जाहीर होईपर्यंत अंतर्गत नाराजी पूर्णपणे संपेल, याची खात्री देता येत नाही. विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या प्रभावी प्रभागांत उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तिथे समेट साधणे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे नेत्यांनीही जागा वाटपाचा फॉर्म्युला झाकली मूठ सव्वा लाखाची अशा पध्दतीने ठेवला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी ही रणनिती आखण्यात आली आहे.
महाविकासचाही ‘फॉर्म्युला’ तयार...
महाविकास आघाडीत काँग्रेसला 70 जागा, ठाकरे शिवसेनेला 8 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 3 जागा देण्याचा ‘फॉर्म्युला’ ठरल्याचे सांगण्यात येते. हा ‘फॉर्म्युला’ पाहता महाविकास आघाडीत काँग्रेस ‘मोठा भाऊ’ असेल. या ‘फॉर्म्युल्या’मुळे ठाकरे सेना आणि शरद पवार गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचीही चर्चा सुरू आहे.