

कोल्हापूर ः काँग्रेसने राष्ट्रवादीच्या हातात हात घालून महापालिकेसह जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व राखले. मात्र, कालांतराने एकेक संस्था काँग्रेसच्या हातातून निसटल्या. आता तर राजकीय फासे पूर्णतः पालटले आहेत. कोल्हापूरच्या राजकारणात दोस्त दुश्मन बनले आहेत, तर दुश्मन दोस्त झाले आहेत. परिणामी, महायुतीच्या ‘रडार’वर आता काँग्रेस पक्ष आला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी महायुती आडाखे बांधत आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे निशाण्यावर आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राजकीय खेळी केल्या जात आहेत.
महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्याने कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांतही धामधूम सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार, हे स्पष्ट आहे. मात्र, आघाडी आणि युतीमधील पक्षांकडून अद्यापही एकत्र की स्वबळावर रणांगणात उतरायचे? याचा निर्णय झालेला नाही. पक्षीय पातळीवर शक्य तेथे युती किंवा आघाडी; अन्यथा स्वतंत्र लढा, असा संदेश देण्यात आला आहे. त्यानुसार पक्षाचे पदाधिकारी रणनीती आखत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात काही वर्षांपूर्वी निर्विवाद सत्ता असलेला काँग्रेस पक्ष आता एकाकी पडला आहे. कारण, महायुतीने सर्व सत्तास्थाने ताब्यात घेतली आहेत. परिणामी, महापालिकेच्या निवडणुकीतही महायुती काँग्रेसला चक्रव्यूहामध्ये अडकविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. महायुतीची सूत्रे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे नेते खासदार धनंजय महाडिक, माजी खा. संजय मंडलिक यांच्या हातात असणार आहेत.
कोल्हापूर महापालिका हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथे काँग्रेसची पारंपरिक पकड राहिली आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसने बर्याच जागांवर यश मिळविले असून, शहरातील मध्यवर्ती प्रभागांमध्ये अजूनही पक्षाची छाप आहे. मात्र, 2019 नंतरच्या राजकीय उलथापालथींमुळे काँग्रेस पक्ष कोल्हापुरातही अडचणीत आला आहे. सतेज पाटील यांच्यासारखे सत्ताकेंद्र मानले जाणारे सध्या पक्षात एकाकी पडले आहेत. त्यांच्या भोवतीचा जुना संघ बिघडलेला आहे. अनेक कार्यकर्ते व निष्ठावंत इतर पक्षांकडे झुकले आहेत. हे ओळखूनच महायुतीने त्यांना लक्ष्य करण्याचे धोरण ठरवले आहे. काँग्रेस टार्गेट ठेवल्याने अन्य विरोधक आपोआप बाजूला होतील, अशी महायुतीची गणिते आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना युतीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. काहींना थेट शिवसेना शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश देण्याची तयारी आहे; तर काहींना अपक्ष म्हणून उभे करून काँग्रेसची मते फोडण्याचा विचार केला जात आहे.
महायुतीने सतेज पाटील यांच्यासाठी आखलेला चक्रव्यूह किती परिणामकारक ठरेल हे येणार्या महिन्यांत स्पष्ट होईल. मात्र, सतेज पाटील यांच्यासमोरील लढाई ही केवळ विरोधकांची नसून, पक्षातंर्गत एकजुटीच्या अभावाशीही आहे. जर त्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, नव्या नेतृत्वाला पुढे आणले आणि काँग्रेसच्या परंपरेचा उपयोग केला, तर युतीच्या योजना फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्परतेने संघटनेची उभारणी केली, तर सतेज पाटील हे अजूनही कोल्हापूरच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावू शकतील. मात्र, त्यासाठी आता वेळ कमी आणि आव्हान मोठे आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणातून काँग्रेस नेते आमदार बंटी ऊर्फ सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा ‘याराना’ सुरू झाला. स्वबळावर लढून महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी पाटील व मुश्रीफ यांनी हातमिळवणी केली. मुश्रीफ यांनी पाटील यांच्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांना लांब केले. पाटील व मुश्रीफ यांनी महापालिकेनंतर जिल्हा बँक आणि ‘गोकुळ’ची सत्ताही ताब्यात घेतली. परंतु, आता राज्याच्या राजकारणाचा जिल्ह्यातील राजकारणावरही परिणाम झाला आहे. मंत्री मुश्रीफ आता महायुतीमध्ये, तर महाडिक भाजपमध्ये आहेत. परिणामी, दोघे एकत्र आले आहेत; तर मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीत असलेल्या सतेज पाटील यांना लांब केले आहे. परंतु, महापालिका निवडणुकीत गेली दहा वर्षे एकत्र सत्तेत असल्याने मंत्री मुश्रीफ कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष असेल.
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित नसून, पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाचे संकेत देणारी ठरणार आहे. काँग्रेससाठी ही निवडणूक अस्तित्व टिकविण्याची लढाई आहे; तर भाजपसाठी ही निवडणूक त्यांच्या विस्ताराच्या स्वप्नाची पहिली पायरी आहे. शिवसेना शिंदे गट व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक आपल्या ताकदीचे प्रदर्शन ठरणार आहे.