Gokul Election 2026 | महायुतीची बैठक निष्फळ; गोकुळचे जागा वाटप मुख्‍यमंत्र्यांच्‍या कोर्टात

मंगळवारी मुंबईत मुख्‍यमंत्र्यांसमवेत बैठक शक्‍य
कोल्‍हापूर : गोकुळसंदर्भात जिल्‍ह्यातील महायुतीच्या नेत्‍यांची शहरातील एका हॉटेलमध्‍ये बैठक झाली. बैठकीसाठी महायुतीचे नेते एकत्र आले होते.
कोल्‍हापूर : गोकुळसंदर्भात जिल्‍ह्यातील महायुतीच्या नेत्‍यांची शहरातील एका हॉटेलमध्‍ये बैठक झाली. बैठकीसाठी महायुतीचे नेते एकत्र आले होते.
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : गोकुळच्‍या ठरावांसाठी रविवारी शहारातील एका हॉटेलमध्‍ये झालेली महायुतीची बैठक निष्फळ ठरली. ठरावांच्‍या संख्‍येवरून नेत्‍यांमध्‍ये एकमत न झाल्‍याने तालुकानिहाय सुरू असलेली ठरावांची पडताळणी नेत्‍यांनी थांबविली. बैठक निष्‍फळ ठरल्‍याने कोणत्‍या पक्षाकडे किती ठराव हेच निश्‍चित झाले नाही. त्‍यामुळे महायुतीच्‍या जागा वाटपाचा चेंडू आता मुख्‍यमंत्र्यांच्‍या कोर्टात गेला आहे. मुख्‍यमंत्र्यांसोबत जिल्‍ह्यातील महायुतीच्‍या सर्व नेत्‍यांची मंगळवारी मुंबईत बैठक होण्‍याची शक्‍यता आहे.

महायुतीमध्‍ये गोकुळचे कोणत्‍या पक्षाकडे किती ठराव, यावरून सहा तालुक्‍यांत तिढा निर्माण झाला होता. हा तिढा सोडविण्‍यासाठी महायुतीच्‍या नेत्‍यांची रविवारी शहरातील एका हॉटेलमध्‍ये बैठक झाली. बैठकीच्‍या ठिकाणीच करवीर, पन्‍हाळा, गडहिंग्‍लज, आजरा, हातकणंगले आणि भुदरगड या सहा तालुक्‍यांतील ठरावांची पडताळणीही सुरू होती. राष्‍ट्रवादीने १७००, भाजपने १३००, शिवसेना शिंदे गटाने १३०० ठराव असल्‍याचा दावा केला; मात्र ठरावांवरून एकमत होत नसल्‍याने नेत्‍यांमध्‍ये तणातणी झाली. बैठक वादाच्‍या दिशेने जात असल्‍याने नेत्‍यांनी ठरावांची पडताळणी थांबविली. बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, माजी खा. संजय मंडलिक, माजी आ. संजय घाटगे, जि.प.चे माजी अध्‍यक्ष राहुल पाटील आदींसह माजी संचालक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्‍थित होते.

आ. कोरेंची मंत्री पाटील, मंत्री मुश्रीफ यांच्‍यासोबत चर्चा

गोकुळ निवडणुकीत जागा वाटपात आ. विनय कोरे केंद्रस्‍थानी राहिले आहेत. रविवारी बैठकीदरम्‍यान पहिल्‍यांदा आ. कोरे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍यात बैठकीच्‍या ठिकाणी स्‍वतंत्रपणे चर्चा झाली. यानंतर आ. कोरे व मंत्री हसन मुश्रीफ यांच्‍यामध्‍येही अशाच पद्धतीने चर्चा झाली. येथील लॉनमध्‍ये झालेल्‍या या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधले; मात्र त्‍यांच्‍यामध्‍ये काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही.

वरिष्‍ठ नेते सांगतील तो फॉर्म्युला मान्‍य

महायुतीमधील घटक पक्षांनी सांगितलेल्‍या ठरावांच्‍या संख्‍येवरून एकमत होत नसल्‍याने रविवारची बैठक निष्‍फळ ठरली. प्रत्‍येक पक्षाकडे असलेली ठरावांची संख्‍या पाच ते दहा टक्‍के इकडे तिकडे होणार, हे निश्‍चित धरून नेत्‍यांनी बैठकीतील वस्‍तुस्‍थिती मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासमोर मांडण्‍याचा निर्णय घेतला. महायुतीचे वरिष्‍ठ नेते जागा वाटपाचा जो फॉर्म्युला ठरवतील तो मान्‍य करण्‍याबाबत नेत्‍यांमध्‍ये एकमत झाल्‍याचे समजते.

कोणत्‍या पक्षाला किती जागा ?

महायुतीचा गोकुळसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसला, तरी राष्‍ट्रवादीने ९ जागांवर दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाने ७ आणि स्वीकृत एक, भाजप ७ आणि स्वीकृत एक, शासन नियुक्‍त एक, जनसुराज्‍यने दोन जागांसह अनुसूचित जाती गटातील जागा मागितली आहे. आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची एक जागा निश्‍चित आहे. महायुतीमधील घटक पक्षांची अशी अपेक्षा असून यावर मुख्‍यमंत्री निर्णय घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news