

कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न साकारण्याची संधी मिळत आहे. वातावरणही चांगले असल्याने गाफील न राहता एकसंध राहून महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करताना गंभीरपणे विचार करा, असे जिल्हा संघटक सत्यजित कदम म्हणाले.
मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. आ. क्षीरसागर म्हणाले, महाविकास आघाडीचे महापालिका सत्तेतील आणि विरोधी कारभारी दोघेही शिवसेनेत आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद समजून येईल. कोणावर अन्याय होऊ नये ही भूमिका असली तरी महायुतीचा महापौर होण्यासाठी सक्षम उमेदवार द्यावा लागेल. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला विकासकामातून उत्तर द्या.
उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, उमेदवारी कोणालाही मिळो, धनुष्यबाणच उमेदवार समजून प्रत्येकाने काम करावे. कदम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रामाणिकपणे युतीधर्म पाळला जात नाही, डमी उमेदवार उभे करून मित्र पक्षांना धोका देण्याचे काम केले आहे. त्यांच्याशी युती करताना गंभीरपणे विचार करा. शिवसेनेचे 4-5 नगरसेवक असतात, असे टोमणे मारणार्यांनी आता परिस्थिती बदलली आहे हे ध्यानात ठेवावे.
जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, युती झाली तर ठीक, पण स्वबळळावरही लढण्यास शिवसेना सज्ज आहे. दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख म्हणाले, शिवसेनेस चांगले वातावरण आहे. याचा फायदा घेऊन अधिकाधिक नगरसेवक निवडणून आणूया. विधानसभेत पराभूत झाल्यावर वर्षाने उगवलेला उमेदवार प्रचार कालावधी सोडला तर कधी कावळा नाक्यापुढे आलाच नाही, असा टोला त्यांनी राजेश लाटकर यांचे नाव न घेता लगावला. मेळाव्यास जिल्हा संघटक विनायक साळोखे, शहरप्रमुख रणजित जाधव, महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, किशोर घाटगे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, दुर्गेश लिंग्रस, रणजित मंडलिक, दीपक चव्हाण, माजी नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
थेट पाईपलाईनमध्ये किती पाणी मुरलंय, वेळ आल्यावर जाहीर करू
थेट पाईपलाईनच्या पाण्याने आंघोळ करताना बादली नेमकी कोणी दिली? शारंगधर, बादली तुम्ही दिली की, त्यांनीच आणली, असा टोला महानगरप्रमुख शिवाजी जाधव यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला. त्यावर देशमुख यांनी, थेट पाईपलाईनमध्ये किती पाणी मुरलंय आणि पाण्याला कुठले कलर दिले गेले हे वेळ आल्यावर जाहीर करू, असे उत्तर दिले.