Kolhapur Municipal Corporation |शिवसेना, भाजपला प्रत्येकी 33 जागा, उर्वरित राष्ट्रवादीला
चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीतील जागावाटपाबाबतचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यानुसार शिंदे शिवसेना व भाजपला प्रत्येकी 33 जागा देण्याचा प्रस्ताव आहे. उर्वरित जागा अजित पवार राष्ट्रवादीला देण्यात येणार आहेत. मित्रपक्षांचा विषय चर्चेवेळी सोडविण्यात येणार आहे. मूळ राजकीय पक्षांचे ज्या मित्रपक्षाशी पूर्वी जागावाटप होते, त्यांना त्यानुसार जागा देण्यात येतील, अशी चर्चा आहे. कोल्हापूर महापालिकेची नव्याने प्रभाग रचना होणार असून, बहुतेक 80 किंवा 82 नगरसेवक निवडून द्यावे लागतील, त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला 14 किंवा 16 जागा येतील, अशी शक्यता आहे.
शिंदे शिवसेना, भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबरच जनसुराज्य शक्ती हा घटकपक्षही महत्त्वाचा आहे. शिंदे शिवसेनेचे महायुतीत 4 आमदार आहेत. तीन आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले असून, एक सहयोगी आमदार आहेत. भाजपचे तीन आमदार आहेत. त्यापैकी दोन पक्षाच्या चिन्हावर निवडून आले असून, एक सहयोगी आमदार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत, तर अजित पवार राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. जिल्ह्यातील सर्व दहाच्या दहा जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. लोकसभेचे एक खासदार काँग्रेसचे, एक शिंदे शिवसेनेचे आहेत. राज्यसभा खासदार भाजपचे आहेत. जिल्ह्यातील विधान परिषदेवरील दोन्ही आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत.
संसद व विधिमंडळात शिंदे शिवसेनेचे बळ सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ भाजपची ताकद आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिंदे शिवसेनेकडे आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन पक्षांचा जागावाटपात जास्ती जागा मिळाव्यात, असा आग्रह असणार हे उघड आहे. त्याचे सूतोवाच भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. विसर्जित महापालिकेतील संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर भाजपला 33 जागा हव्यात, अशी मागणीच पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करताना केली. पाटील यांनी केलेली ही मागणी अशी तशीच केलेली नाही.
महायुती म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील त्या त्या पक्षाची ताकद प्राथमिकस्तरावर आजमावून हे संभाव्य जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. प्रत्यक्ष नेत्यांची चर्चा होईल त्यावेळी जागावाटपाचे अंतिम चित्र स्पष्ट होईल; मात्र सध्या चर्चेसाठी हे ठरविण्यात आले आहे. या मूळ संभाव्य प्रस्तावावरच महायुतीचे पुढील जागावाटप ठरणार आहे.
विसर्जित महापालिकेतील पक्षांचे बलाबल कोल्हापूर महापालिकेची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली, तेव्हापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. विसर्जित महापालिकेत राजकीय पक्षांचे बलाबल पुढीलप्रमाणे होते.
...असा आहे जागावाटपाचा प्रस्ताव
महायुतीने जो संभाव्य जागावाटपाचा प्रस्ताव तयार केला आहे, त्यानुसार शिंदे शिवसेना व भाजप प्रत्येकी 33 व उर्वरित जागा अजित पवार राष्ट्रवादीला असे सूत्र आहे. महापालिकेच्या एका प्रभागातून 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. प्रभाग रचना अद्याप झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, 20 ते 21 प्रभाग होतील. 21 वा प्रभाग झाल्यास तो लहान म्हणजे एक किंवा दोन सदस्यांसाठी असेल. त्यामुळे
20 प्रभाग झाल्यास महायुतीत राष्ट्रवादीला 14 किंवा 21 प्रभाग झाल्यास 15 ते 16 जागा मिळतील, असे सध्याचे चित्र आहे. जागावाटपाची अंतिम बैठक होईल तेव्हा प्रत्यक्ष जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल.

