

कोल्हापूर : महापालिकेची आगामी निवडणूक महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा असून याबाबतची निर्णायक बैठक नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असून पुढील चार दिवसांत महायुतीवर शिक्कामोर्तब होऊन जागा वाटपाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) किती जागा द्यायच्या, यावरून मतभेद निर्माण झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यात प्राथमिक चर्चा झाली होती; मात्र त्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक उपस्थित नसल्याने विस्तृत चर्चा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता नागपूर येथे सर्व प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक घेण्याचे ठरले आहे.
महापालिकेच्या 81 जागांसाठी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 35 जागांवर लढण्याची तयारी दाखवत असून राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) किती जागा द्यायच्या, यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. सध्या 11 ते 15 जागांची ऑफर चर्चेत असली, तरी राष्ट्रवादीने त्याला ठाम विरोध दर्शवला आहे. गतसभागृहात 15 जागा आमच्याकडे होत्या. त्यामुळे यावेळी अधिक जागांचा आमचा आग्रह राहील, अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी वरिष्ठ नेत्यांची चर्चा होईल, त्यानंतर यावर बोलू, असे सांगितले. भाजपचे शहराध्यक्ष विजय जाधव यांनी महायुतीसाठी तिन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे सांगितले.
नागपुरातील बैठकीत जागा वाटपाचा निर्णय शक्य
महापालिका निवडणुकीतील जागा वाटपाबाबत नागपुरात बैठक होणार आहे. यामध्ये भाजपकडून मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार धनंजय महाडिक, तर शिवसेनेकडून आ. राजेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ सहभागी होणार आहेत. बैठकीनंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय निश्चित केला जाणार आहे. महायुती होणारच असा दावा, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला आहे.