Kolhapur Politics | सत्तेचा माज सतेज पाटील यांनाच येतो; चंद्रकांत पाटील साधंभोळं व्यक्तिमत्त्व

महायुतीच्या नगरसेवकांचा टोला; बौद्धिक क्षमता नसलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी फुकटची लुडबूड करू नये
Kolhapur Politics |
Kolhapur Politics | सत्तेचा माज सतेज पाटील यांनाच येतो; चंद्रकांत पाटील साधंभोळं व्यक्तिमत्त्वPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : सतेज पाटील हे गृह राज्यमंत्री असताना त्यांनी केलेला सत्तेचा गैरवापर आपण पाहिला आहे. त्यामुळे सत्तेचा माज सतेज पाटील यांनाच येतो, याचे आम्ही साक्षीदार आहोत. मंत्री चंद्रकांत पाटील हे साधंभोळं व्यक्तिमत्त्व आहे, असा टोला कोल्हापूर महापालिकेतील महायुतीच्या नगरसेवकांनी शनिवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत लगावला. दोन पाटलांच्यातील हे युद्ध आहे. त्यांचे ते बघतील. बौद्धिक क्षमता नसलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी फुकटची लुडबूड करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, काँग्रेसच्या मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने टीका झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली. मोठ्या नेत्यांच्या युद्धात लहान मंडळींनी पडू नये. चंद्रकांत पाटील हे सत्तेचा माज न येणारे व्यक्तिमत्त्व आहे. गृह राज्यमंत्री असताना सतेज पाटील यांना बघितलेल्यांना कळेल की, सत्तेचा माज त्यांना कसा होता?

वैद्यकीय महाविद्यालय आल्याने पोटशूळ

शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख म्हणाले, यश मिळाले तर आपल्यामुळेच आणि अपयश आल्यावर कार्यकर्त्यांमुळे, असा सतेज पाटील यांचा स्वभाव आहे. गोकुळमध्ये एकटा लढलो म्हणणाऱ्या सतेज पाटील यांना खा. शाहू महाराज, माजी खा. राजू शेट्टी यांचा विसर पडला. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वैद्यकीय महाविद्यालय आणल्याने सतेज पाटील यांच्या संस्थांचे नुकसान होणार म्हणून त्यांना पोटशूळ उठला आहे, असा आरोप केला. पत्रकार परिषदेला सभागृह नेता मुरलीधर जाधव, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, राष्ट्रवादी गटनेता आदील फरास आदी उपस्थित होते.

सतेज पाटील यांना हीरो बनण्याची घाई

देशमुख म्हणाले, सतेज पाटील यांनी २००८ मध्ये स्थायी समिती निवडीवेळी गैरमार्गाने सुनील मोदी यांना सभापती केले. आम्ही विचारल्यावर पार्टी म्हणून करावे लागते, असे सांगितले. मग, त्यांनी केले ते राजकारण आणि दुसऱ्याने केले तर ते चुकीचे कसे? तसेच माजी महापौर सुनील कदम हे स्वीकृत नगरसेवक म्हणून येऊ नयेत म्हणून त्यांनीच खेळी केली होती. सतेज पाटील हेच सत्तेचा गैरवापर करतात.` ऋतुराज क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांना हीरो बनायची घाई असल्याचा टोला हाणला.

रवींद्र धंगेकर वैफल्यग्रस्त

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेला, विधानसभेला पाडले. पुणे महापालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती पराभूत झाल्या. त्यामुळे धंगेकर वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या वक्तव्यांना कोण मनावर घेत नाहीत. त्यांच्याविरुद्ध भाजपच्या वरिष्ठांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.